पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

असतात (वाटतात). सामान्य माणसातील या संदर्भातला चाणाक्षपणाही मतिमंदांत नसतो. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात काळजी, दक्षता घेण्याची जाण मतिमंद मुलीत नसते. म्हणून सतत काळजी वाटत राहते. यासाठी विकास काळात सतत औपचारिक, अनौपचारिक शिक्षण, प्रयत्न करत राहन जाण निर्माण करणे हाच एकमेव मार्ग होय. लैंगिक व्यवहारातून येणा-या बदलाची, व्यवहारातून निर्माण होणा-या जबाबदारीची जाणीव मतिमंदात असत नाही. म्हणून मुलींच्या संदर्भात बारा वर्षांच्या तर मुलांसंदर्भात चौदा वर्षाच्या आसपास जेव्हा लिंगभेदाची जाणीव, त्यांना मुला-मुलीतील फरक जाणवू लागल्याच्या काळातच लैंगिक साक्षरतेचा प्रयत्न सुरू व्हायला हवा. हे शिक्षण व्याख्यानातून येत नाही. पालक, शिक्षकांनी ते सतत जाणीव निर्माण करण्याच्या बहुअंगी प्रयत्नातून द्यायला हवे.
 यासाठी आपणाकडे सर्वप्रथम सामान्यांसाठी लैंगिक लोकशिक्षणाची चळवळ रुजवायला हवी. माझ्या मते, आपणाकडे लैंगिकतेचा खरा प्रश्न सामान्यात आहे. सामान्य जोवर ‘लैंगिक साक्षर' (सेक्शुअल लिटरेट) होणार नाही, तोवर मतिमंदांच्या लैंगिकतेसंबंधीचे सामाजिक अपराधीकरण थांबणार नाही. मतिमंदांचे अजाणतेपणे केलेले लैंगिक व्यवहार आपणास संकोचाचे, अपराधीपणाचे वाटतात. ते या संबंधीच्या आपल्या निरक्षरतेमुळे. मतिमंद मुले-मुली वयात येऊ लागली की आपण त्यांना आक्रमक व अपराधी करत असतो. मतिमंदांच्या लैंगिक तथाकथित दुर्व्यवहार, गैरव्यवहार वा अपराधाचे खरे गुन्हेगार सर्वसामान्यपणे समाज, पालक व शिक्षकच आहेत, अशी माझी धारणा आहे. योनिशुचितेची पारंपारिकता, गर्भधारणेचे भय, विवाह संबंधांना अमान्यता यामुळे मतिमंदांना आपण लैंगिक हक्कापासून वंचित ठेवतो, याचे आपणास भानच राहत नाही. मतिमंदांचे संगोपन व शिक्षण आपणाकडे एकांगी राहिलेल आहे. मानवी लैंगिकतेचे सहजभान मतिमंदात निर्माण करणे आव्हान आहे, याची मला जाणीव नाही अशातला भाग नाही. या प्रश्नाला आपण भिडू शकत नाही. हा प्रश्न रकान्यात सोडून आपण स्वस्थ बसतो. कुटुंब, समाजाचा भाव सामान्यांप्रमाणे मतिमंदांत ‘विधायक लैंगिक आत्मभान' निर्माण करणे. आपल्या सर्व वर्तन व्यवहाराचे लक्ष्य असायला हवे. त्यासाठी कळत्या वयात निरीक्षणाखाली लैंगिक व्यवहाराच्या संधी उपलब्ध करून देऊन काही अंशी जबाबदारी घेऊन हा प्रवास ‘रोज एक पाऊल पुढे' या नात्याने करत राहणेच योग्य.

वंचित विकास जग आणि आपण/५३