पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आकाश अमर्याद आहे. ते संस्था नि योजनांच्या मर्यादेत साधता येणार नाही. वंचितांच्या विकासाचे कार्य योजना व संस्थांच्या भिंतीत कधीच पूर्ण होणार नाही. वंचित ज्या समाजात निर्माण होतात त्या समाजातील इतरेजनांप्रमाणे त्यांना जगण्याचा अधिकार व शक्यता निर्माण करून देणे हा वंचित विकासाचा प्रमुख उद्देश असायला हवा. वरच वंचित समुदाय विकासाचे आकाश आपल्या कवेत घेऊ शकतील, पण हा दूरचा प्रवास आहे. तो पूर्ण होईपर्यंत आपणास वंचित विकासाचे कार्य दोन मार्गाने समांतर, परंतु पूरकपद्धतीने करायला हवे. एकीकडे विद्यमान योजना नि संस्था सुधारणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे चालू ठेवायला हवे तर दुसरीकडे विद्यमान संस्थांचे कार्य संस्थाबाह्य सेवा-सुविधा पुरवून ते समाजोन्मुख व समाजकेंद्री करायला हवे. विशेषत: नव्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संस्थात्मक संरचना उभी करण्यापेक्षा विस्तार कार्याच्या रूपाने संस्थाबाह्य सेवा सुविधा पुरविण्याबाबत कटाक्ष ठेवायला हवा. असे झाले तरच वंचित विकासाचे आकाश निरभ्र राहील.
 आज सामाजिक, शैक्षणिक योजना नि संस्था या राजकीय स्वार्थ व व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याची केंद्रे होऊ लागली आहेत. नजीकच्या काळात तथाकथित साखर सम्राट, शिक्षण महर्षी व पंचक्रोशीचे भाग्यविधाते आपले भाग्य उजाळण्यासाठी वंचितांच्या विश्वात प्रवेश करती झाली तर आश्चर्य वाटायला नको. त्याची चाहल लागली आहे. हे स्वार्थी ढग जमण्यापूर्वीच पांगवणे समाजहिताचे ठरावे. वंचित विकासाचे आकाश स्वार्थ, भ्रष्टाचार, अपहार इत्यादीने ग्रासू नये म्हणून वेळीच बंदोबस्त व्हायला हवा. त्यासाठी वंचित विकास साधणारी यंत्रणा अधिक निर्दोष व लोभमुक्त कशी राहील, हे जाणीवपूर्वक पाहायला हवे.
 वंचित विकासाच्या योजना सामाजिक न्याय व सुरक्षांच्या कसोटीवर प्राधान्य क्रमाने व प्रसंगी आर्थिक झुकते माप देऊन राबवायला हव्यात. त्यासाठी शासकीय लालफिती कार्यपद्धती बाजूस ठेवून निर्णय प्रक्रिया गतिशील करायला हवी. योजनांचे दीर्घकालीन नियोजन, योजनात कालपरत्वे बदल करण्याची सोय, निरंतर मूल्यांकन, या बाबींवर सतत लक्ष केंद्रित करायला हवे. याकरिता मंत्रालय ते गावपातळीपर्यंत अधिकार व कार्याच्या विकेंद्रीकरणाची योजना तयार करायला हवी. योजनांची आखणी व अंमलबजावणी ही लाभार्थी केंद्रित व लाभार्थीच्या गरजा लक्षात घेऊन करायला हवी. योजनांच्या अंमलबजावणीत नेहमी शासकीय पातळीवर दिसून येणारा रूक्षपणा व ताठर भूमिका यांना फाटा द्यायला हवा, तरच वंचितांचा तो खरा विकास ठरेल.

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/१२