पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/596

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रो० मॅक्सम्यूलर यांचा मृत्यु. ५७९ विद्यालयांतील संस्कृत प्रोफेसरची जागाही मॅक्सम्यूलरसाहेबांस मिळूं दिली नाहीं! पण दीर्घोद्योग व सत्यनिष्ठा यांचा अखेरीस जय होऊन मॅक्सम्यूलरसाहेबांचे विचारच सर्वमान्य ठरले.असो,सांगावयाची गोष्ट एवढीच कीं,'वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायानें पृथ्वीवरील सर्व देशांतील लोकांबद्दल, त्यांच्या धर्मविचाराबद्दल अथवा आचाराबद्दल समताबुद्धि कायम ठेवून त्याचे कल्याण व्हावें अगर त्यांनीं ऊर्जित दशेस यावें अशी मनापासून इच्छा बाळगून त्याकरितां आपल्या हातून होईल तेवढा उद्योग करणें हें खरें सत्वशील विद्वानाचें लक्षण होय व तें लक्षण प्रो. मॅक्सम्यूलर याच्या अंगीं पूर्णपणें आढळून येत असल्यामुळे पत्रव्यवहारानें समक्ष भेटीनें किंवा त्यांच्या ग्रंथांच्या परिशीलनानें त्यांच्याशीं ज्याचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष संबंध झालेला होता त्या लोकांची मग ते कोणत्याही धर्माचे असोत त्याच्याबद्दल पूज्यबुद्धि झालेली होती. ‘शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः'असें जें भगवद्गीतेंतील वाक्य आहे तें बऱ्याच अशीं मॅक्सम्यूलर साहेबांस लागू पडत होतें, याची त्याच्या ग्रथांतून, विचारसरणींतून व किरकोळ लेखांतूनही जागोजाग प्रतीति येते. जगांतील निरनिराळ्या धर्मांचीं पुस्तकें इंग्रजीत भाषांतर होऊन ‘सेक्रेड बुक्स् ऑफ धी ईस्ट' या नांवाची जी एक ग्रंथमाला प्रसिद्ध झाली आहे, तिचे पुरस्कर्तृत्व मॅक्सम्यूलरसाहेबांनीच घेतलें होते व याखेरीज याच विषयावर त्यांनीं ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या सर्वावरून त्याची विद्वत्ता,समताबुद्धि व विचारौदार्य चांगल्या रीतीनें व्यक्त होतात. परंतु आमच्या हिंदुस्तान देशाच्या दृष्टीनें विचार करता संस्कृत भाषा, संस्कृत धर्मग्रंथ वगैरे विषयांसंबंधाने पाश्चात्य देशांतून पूज्यबुद्धि उत्पन्न करून आर्यलोकांचे प्राचीन ग्रंथ, धर्मविचार किंवा बुद्धिवैभव यांस युरोपांतील राष्ट्रात आपल्या ग्रंथलेखनानें यानीं जें अग्रस्थान मिळवून दिले आहे, त्याबद्दल आम्हीं त्यांचे उपकार मानावे तितके थोडेच आहेत. वेद किंवा इतर संस्कृत धर्मग्रंथ यांच्या सतत अभ्यासानें हे अंतःकरणानें व विचारानें हिंदूच बनून गेले होते; व तारुण्यांत असतां हिंदुस्थानांत जाऊन गंगेच्या पवित्र उदकात मी एकदां केव्हां स्नान करीन असें यांस झालेले होतें. पण दैवगति अशी कांहीं विचित्र आहे कीं, हा त्यांचा हेतु आमरणांत त्यास कांहींना कांहीं तरी कारणानें तडीस नेतां आला नाहीं. शांकर अद्वैतसिद्धान्ताचे मर्म कळून त्याचे मंडण करणारे जर्मन प्रोफेसर डयूसन जेव्हां इकडे आले होते तेव्हां ते पूर्वजन्मीं मी हिंदू होतों असे म्हणत असत. प्रो.मॅक्सम्यूलर यांची हिंदुस्थानबद्दलची कळकळ मनात आणतां तेही पूर्वजन्मीं हिंदूच होते की काय असा विचार सहज मनांत येतो. प्रो.मॅक्सम्यूलर साहेब हे हिंदुस्थानांत आले नाहींत ही एक चांगलीच गोष्ट झाली; कारण ते इकडे आले असते तर हल्लींची हिंदुस्थानची स्थिति पाहून प्राचीन ग्रंथाध्ययनानें लोकांबद्दल जो त्यांचा अनुकूल ग्रह झालेला होता तो फिरला असतां असें मुंबईच्या टाईम्सकाराचें म्हणणे आहे. पण हें म्हणणें अगदीं चुकीचें आहे. हिंदु