पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/597

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८० लो० टिळकांचे केसरींतील लेख. स्थानावर किंवा हिंदुलोकांवर राज्य करण्याकरितां किंवा येथें पैसे मिळविण्याकरितां आलेल्या अंमलदारांस किंवा व्यापा-यांस हिंदूंची हल्लींची स्थिति पाहून त्यांच्याबद्दल कळकळ न बाळगण्यास ही एक नवीन सबब होते किंवा होईल हें खरें आहे; कारण उदार बुद्धीचा यांच्या हृदयांत बहुतेक नष्टांशच झालेला असतो. पण जुन्या संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनाने या देशांतील लोकांच्या बुद्धिमत्तेचे खरें स्वरूप ज्यानें ओळखलें आहे, त्यास आज सतत हजार अकराशें वर्षे परराज्याखालीं राहिल्यानें ज्यांच्या अंगच्या शौर्यादि गुणांचा थोडाबहुत -हास झालेला आहे त्यांची सद्य स्थिति पाहून कींवच येईल यांत शंका नाहीं. सारांश, प्रो. मॅक्सम्यूलर हिंदुस्थानांत आले असते तर हल्लींच्या निकृष्ट स्थितीबद्दल सर्व दोष आमच्या माथीं न मारतां त्यांनीं तो ब-याच दिवस चालत आलेल्या आमच्या परवशतेचे फल आहे असें मत दिले असतें, असे म्हणण्यास त्यांच्या ग्रंथाचा पूर्ण आधार आहे. जगांतील राजकीय घडामोडी कशा चालल्या आहेत हें त्यास अवगत नव्हतें असें नाहीं,तसेच मनुष्याचा स्वभाव व धर्म यांचेही त्यांस पूर्ण ज्ञान होतें. तेव्हां हल्लींची हिंदु लोकांची स्थिति निकृष्ट असल्यास प्राचीन ग्रंथाध्यायनानें हिंदुलोकांबद्दल उत्पन्न झालेली त्यांची आस्था व कळकळ गेली असती असें म्हणणें अगदीं असमंजस होय. सारांश, त्यांच्या अंत:करणाचा ओढा जात्याच हिंदु लोकांकडे होता. तशाच प्रकारची हिंदु लोकांबद्दल आस्था व कळकळ येथे राज्य करण्याकरितां येणा-या लाकांनीं ठेविली पाहिजे असें सिव्हिल सर्व्हिसच्या विद्यार्थ्यास त्यांनीं जीं व्याख्याने दिलीं त्यांत स्पष्ट म्हटलेले आहे. हिंदुस्थानाबद्दलची त्यांची कळकळ खऱ्या निष्काम बुद्धीची होती आणि असला सहजस्नेह 'मनो हि जन्मांतर संगतिज्ञम्' किंवा 'व्यतिषजति पदार्थान्नान्तरः कोऽपि हेतुः' या न्यायानेंच उत्पन्न होत असतो. त्यांची कळकळ आणि येथे आमच्यावर राज्य करण्याकरितां येणाऱ्या व आमच्या पैशानें श्रीमंत होऊन पुन्हा स्वदेशी जाऊन आम्हांस हलके समजणाऱ्या किंवा शिव्या देणाऱ्या लोकांची बेगडी कळकळ यांच्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. एक खरें बावन्नकशी सोनें होय, आणि दुसरी नुसती पितळ होय; व यांपैकीं पहिल्यास दुस-याचे मापानें मोजण्याचा किंवा पारखण्याचा प्रयत्न करणें वेडेपणाचे लक्षण होय. असो. हिंदुस्थान देशासंबंधानें खरी निष्काम कळकळ बाळगणारा व ज्या आर्यावर्तांच्या प्राचीन विद्वानांच्या ग्रंथांचे अध्ययन करण्यांत आपलें अयुष्य सुखानें गेलें त्यांतील हल्लींच्या पिढीचे मनापासून कल्याण व्हावे असें इच्छिणारा एक विद्वान व आजन्म विद्याव्यासंगी गृहस्थ जगांतून नाहींसा झाला याबद्दल सर्व हिंदुस्थानवासीयांस वाईट