पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञेयाज्ञेयमीमांसा. ३११ मूलभूत सिद्धांत दोहीतही सारखाच आहे. तो हा कीं, ब्रह्म हें सत् व त्रिकालाबाधित असून त्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होणें दुर्घट आहे. हाच सिद्धांत सर्व वेदांताचे मूल होय, व तो आमच्या जुन्या पद्धतीनें सिद्ध केलेला ज्यास आवडत नसेल त्यांनीं स्पेन्सरसाहेबांचे ग्रंथ वाचले असतां त्यांस हॅच तत्त्व नव्या युक्तींनीं, प्रमाणानीं आणि पद्धतीनें सिद्ध केलेलें सापडेल. सारांश, या एका सिद्धातासंबंधानें तरी पूर्वेकडील व पश्चिमेकडील तत्वज्ञांच्या सिद्ध करण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी मुख्य विषयासंबंधानें पुरा मेळ आहे. ज्ञेयशास्रास हेंच विधान पूर्णपणें लागू करता यावयाचे नाहीं. कारण, अलीकडे दोन तीनशें वर्षात या शास्त्रासंबंधानें जे शोध झालेले आहेत ते इतके विस्तृत व व्यापक आहेत कीं, पदार्थमात्राचे आमच्या नैयायिकानीं मानलेले सात वर्ग किंवा त्यांचे पोटवर्ग आता पूर्वीप्रमाणेच राहतील असा निश्चय सागतां येत नाहीं. साख्यकारानीं प्रकृति आणि पुरुष अशीं दोनच तत्वें मानलीं असल्यामुळे अवॉचीन शोधाने त्यांच्या वर्गीकरणास फारसा धक्का येणे शक्य नाहीं; पण नैयायिकाची गोष्ट निराळी आहे. कसेही असो, ज्ञानाच्या एकीकरणाची शेवटची पायरी जी वेदात तिच्यासंबंधानें हा न्याय लागू नाही. हें शेवटचे एकीकरण स्पेन्सरसाहेबांच्या मताप्रमाणें अज्ञाततत्त्वांत किंवा आमच्याकडील लोकाच्या मताप्रमाणें ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद शक्तीतच झाले पाहिजे. म्हणजे आमच्याकडील आणि पश्चिमेकडील तत्त्वज्ञानाचे अखेरचे सिद्धांत एकच आहेत आणि सर्वांचे पर्यवसानही एकच आहे. विचारसरणींत किंवा सिद्धांत सिद्ध करण्याच्या पद्धतींत मात्र पुष्कळ फरक झालेला आहे. परंतु हा फरक एका अंशानें इष्टसिद्धिकारक आहे. कारण हजारों वर्षीच्या अंतरानें निघालेल्या विचारसरणीच्या दोन्ही पद्धतीनें जेव्हां एकच सिद्धांत सिद्ध होतो तेव्हा त्या सिद्धांताची सत्यता अधिकच दृढ होते हें निर्विवाद आहे. अर्वाचीन विचारसरणीनें सिद्ध होणा-या या सिद्धांताचे ज्ञान प्राचीनकाळच्या तत्त्वज्ञास कोणत्या त-हेने झाले हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे, व त्याचे उत्तर देण्यास योगशास्राचीही थोडीशी मदत घ्यावी लागेल. पण इतकें खोल शिरण्याचा आमचा इरादा नाहीं. सामान्यरीत्या ज्ञेय आणि अज्ञेय मीमासेंत स्पेन्सरसाहेबानीं जे सिद्धात ग्रथित केले आहेत तत्सदृश आमच्यामधील शास्त्रे कोणतीं एवढेच सांगण्याचा आमचा हेतु होता व त्याप्रमाणे सदर विषयाचे वर थोडें दिग्दर्शन केले आहे. एवढ्याने या विषयाकडे कोणाचे लक्ष जाऊन जर अशा प्रकारची अर्वाचीन व प्राचीन तत्त्वज्ञानावरील ग्रंथाची तुलना करून हा विषय तो महाराष्ट्र जनतेपुढे माडील तर आमच्या श्रमाचे सार्थक झाले असें आम्ही समजूं. विषय इतका महत्त्वाचा व गहन आहे की, त्याची वर्तमानपत्रांतून यापेक्षां जास्त चर्चा करणे शक्य नाहीं.