पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना --**--

लो. टिळकांचे केसरींतील लेख पुस्तकरुपाने प्रसिद्ध करण्याचा उपक्रम आम्हीं सुमारें नऊ वर्षांपूर्वी सुरू केला. त्याप्रमाणें प्रथम राजकीय विषयक लेखाचे तीन खंड पुढीलप्रमाणे प्रसिद्ध झाले. खंड १-पृष्ठसंख्या. ६९५ खंड दुसरा-६३४ खंड तिसरा ४९२.

त्यानंतर हल्लीं, टिळकाचे केसरींत प्रसिद्ध झालेलेच पण संकीर्ण विषयावरील लेख हल्लीच्या या चवथ्या खंडात संग्रहित करून प्रसिद्ध करण्यांत येत आहेत. यांतील विषय धर्म, समाज, वाड्मय, शिक्षण, शास्त्र, इतिहास इत्यादि आहेत. केसरीपत्र लो. टिळकांनी बहुतांशी राजकारणाला वाहिलेंलें असल्यामुळे त्यांत अवातर विषयावर लेख लिहिण्याचा प्रसंग सहसा येत नसे; व तो आला तरी कोणताही विषय आपल्या विशेष आवडीचा किंवा विशेष वादग्रस्त होऊन राहिलेला असल्याशिवाय त्यावर मोठे किंवा स्वतंत्र लेख लिहून टिळकांनी अशा विषयाचा फारसा परामर्ष कधीं घेतला नाहीं.यामुळे अशा अवातर विषयांवरील त्याचे सर्व लेख एकाच खंडात संग्रहित करिता आले. परतु तेवढ्यावरून अशा विषयासंबंधींहि लो. टिळकांची विचारसरणी व भाषाशैली कशी होती हें कोणाहि वाचकास उत्तम प्रकारे कळून येण्यासारखें आहे. सूक्ष्म विवेकाबरोबर निश्चित सिद्धान्ताची माडणी, आणि होता होईल तो कोणत्याहि विषयाला मूलभूत असलेल्या शास्त्राचा व मर्म ताडण्याचा थोडक्यात प्रयत्न हा गुण या खंडातील लेखामधून ठळकपणे दिसून येतो.

चालू राजकारण हे बोलून चालून डोके तापून किंबहुना तापवूनहि घेण्याचा विषय असें टिळक मानीत. यामुळें अशा विषयावरील लेखात समतोलपणा राखण्याचा त्यानी कधीं विशेषसा प्रयत्न केला नाही. स्वमत प्रतिपादनाची ज्याला खरी हौस असेल किंवा अशा विषयांत ज्याची भावना तीव्र असेल त्याला समतोलपणा राखता येणार नाही, किंबहुना तो मुद्दाम राखणे हा अशा लेखाचा गुण न होतां दोषच होतो असे टिळकांना वाटत असे. परंतु शास्त्रीय विषय म्हटला म्हणजे तेथें डोके शांत कसें ठेवावें, शास्त्रशुद्ध कसे लिहावें, कोणच्याहि मुद्द्याच्या दोन्ही बाजू कशा पाहाव्या, वावगा शब्द कसा टाळावा, केवळ बुद्धि व तर्क याच्या द्वारानेंच वाचकाच्या अंतरंगात प्रवेश कसा करावा याची जाणीव टिळकाना, कोणाची त्यांच्याविषयीं एरवीं कल्पना होईल त्याहून अधिक होती हे ओरायन, आर्कटिक होम इन दि वेदाज हे त्याचे इंग्रजी ग्रथ व गीतारहस्य हा त्यांचा मराठी ग्रंथ वाचणारास सहज दिसून येईल. हा त्याचा गुण प्रस्तुत खंडांतील वाड़मयात्मक लेखांमध्यें स्पष्टच दिसतो. धर्म व समाजसुधारणा यांच्या बाबतींत सर्व जन्मभर ते एका विशिष्ट पक्षाचे प्रतिपक्षी म्हणून लिहिणें व बोलणें हें