पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी मनावरचे गारूड : भारूड

 भजनी मंडळामध्ये काहीजण अभंग म्हणणारे असतात. काही जणांचा आवाज आणि लय गौळणी म्हणताना खुलतो, तसेच काहीजण भारूड म्हणण्यात पटाईत असतात. एखाद्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असला, की अशी भारूड म्हणणारी खास मंडळी बरोबर घेतली जातातच. भारूड हा तसा नाट्याच्या अंगाने जाणाराच प्रकार. खेडेगावात लळीत' हा प्रकार आढळतो. तोही नाट्यप्रकारच. यात माणसं वेगळी सोंगे घेऊन नाट्यमय भारूड सादर करत असतात. भारुडामुळे श्रोतृवर्गात विनोद निर्माण होतो, लोक हसतात. एकजण अगोदर थोडीफार प्रस्तावना करतो आणि मग भारुडाला सुरवात करतो. दरवर्षी आषाढी-कार्तिकीला पंढरीची वारी असते. लाखो भाविक लोक या वारीत सामील झालेले असतात. 'ज्ञानबा-तुकाराम' च्या नामगजरात लोक पायी चालत असतात. जिथे पालखीचा मुक्काम पडेल तिथे रात्री जेवणं वगैरे झाली, की अशा भारुडांनाही रंग चढतो. एकाचे म्हणून झाले की दुसऱ्याने. हास्यकल्लोळ उठत राहतो. दिवसभर चाललेल्या श्रमाचाही विसर पडत जातो. वारकरी भारूड ऐकताना तल्लीन होतात, देहभान विसरतात.
 भारुडातून समाजप्रबोधन होतच असते. यातही अध्यात्माचे निरुपण असतेच; पण ते एखाद्या प्रसंगाच्या, गोष्टीच्या रूपानं सांगितलं जातं. बऱ्याच संतांनी भारुडं लिहिली आहेत. ज्ञानदेव, समर्थ रामदास, तुकाराम महाराज, संत एकनाथ, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, निळोबाराय, बहिणाबाई यांसारख्या संतांची भारुडे अजूनही म्हटली जातात. यांच्याबरोबरच नाथसंप्रदायातील महिपतीनाथ, देवनाथ, दत्त संप्रदायातील दासोपंत, महानुभाव संप्रदायातील लोकांनीही भारुडे लिहिली आहेत, तरीही संत एकनाथाची भारुडे मात्र जास्त लोकप्रिय आहेत. भारूड म्हटले, की एकनाथांचेच नाव डोळ्यांसमोर येते.

 याला कारण म्हणजे लोकसमाजातील एकनाथांचा वावर हा सूक्ष्म अध्ययन करणारा होता. माणसांचे स्वभावदोष जाणण्याची विलक्षण नजर त्यांच्याजवळ होती. त्यांचे अनुभवविश्व हे व्यापक होते. त्यांनी भरपर प्रवास केला होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा हा सगळा अनुभव मनोरम रीतीने भारुडामध्ये व्यक्त केला आहे. प्रपंच आणि परमार्थ साधताना माणसाची उडणारी त्रेधातिरपीट त्यांनी भारुडातून मांडली. लौकिक आणि पारलौकिक गोष्टींचा योग्य मेळ एकनाथांनी भारुडात साधला. डॉ. रामचंद्र देखणे यांनी एकनाथांच्या भारुडांचे वर्गीकरण त्यांच्या 'भारूड आणि लोकशिक्षण' या ग्रंथात दिले आहे. ते पाहिले. की जाणवतं एकनाथांची प्रतिभा किती विलक्षण होती. जवळपास साडेतीनशे भारुडे एकनाथांनी लिहिली. प्रबोधनात्मक दृष्टिकोन ठेवताना वेगवेगळी मानवी रूपे म्हणजे कधी वासुदेवाच्या, जोशी, पांगुळ, पिंगळा, सरवदा यांच्या मुखातून भारूड वदवून लोकशिक्षण केले. फक्त

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९१ ॥