पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यल्लमाचा जग, जोगती व जोगतीणी

 रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही मुलं वाड्याच्या चौकात खेळत होतो. तेवढ्यात दरवाजातून डोक्यावर पाटीत देवीचा मुखवटा घेऊन एक बाई आत आली. तिच्या पाठीमागून लुगडं नेसलेला, कपाळाला भंडारा त्यावर रुपायाएवढं कुंकू, अंगात चोळी घातलेला एक माणूस आत आला, त्याच्या हातात चौंडकं होतं. त्याच्या गालावरच्या थोड्याशा दाढीमुळ व हातावरच्या केसामुळं तो पुरुष आहे हे लक्षात येत होतं; पण त्याचं चालणं वागणं थोडंफार बाईसारखंच होतं. ती दोघं आत आल्यावर आम्ही त्यांच्या भोवतीनं जमा झालो. त्या बाईनं डोक्यावरची पाटी खाली ठेवली. तेवढ्यात आजी बाहेर सोप्यात आली म्हणाली 'जोगतीण आली वाटतं' हे त्या वयात मला घडलेलं जोगती आणि जोगतीणीचं पहिलं दर्शन.

 बाईच्या लुगड्यातल्या त्या पुरुषाला जोगती म्हणतात, हेही कोणी तरी सांगितलं. त्याचा जाडा भरडा आवाज त्यावेळी कसातरी वाटला. वाड्यातल्या बायकांनी बाहेर येऊन रेणुका देवीचा मुखवटा, जो त्या मोठ्या पाटीत होता, त्याला हळदीकुंकू वाहिलं. त्या मुखवटा ठेवलेल्या पाटीला 'जग' म्हणतात हेही कळलं. कपाळावर भंडारा, कुंकू लावलेल्या जोगतीणीनं गाणं म्हणायला सुरवात केली. देवीच्या महात्म्याचीच काही गाणी तिनं म्हटली. सोबतीच्या जोगत्यानं चौंडकं वाजवून त्या गाण्याला साथ दिली. मधून-मधून तोही गाण्याला साथ द्यायचा. नंतर धान्याची भिक्षा घेऊन ती दोघं निघून गेली; पण त्यावेळपासून जोगती आणि जोगतीण या विषयीची उत्सुकता मनात निर्माण झाली होती.

 जोगती आणि जोगतीणी हे यल्लमाचे म्हणजेच रेणुका देवीचे उपासक असतात. रेणुका म्हणजेच यल्लमा देवी. रेणुकेच्या जन्माविषयी वेगळी मतांतरे आहेत. महाभारतानुसार रेणुका कमळातून जन्मली आणि सोमेय तिचा पिता (महाभारत अनुशासन पर्व अध्याय ५३) आणि 'प्रसेनजित' हा तिचा पिता हे दुसरे मत. हाही उल्लेख महाभारताच्याच (वनपर्व ११६) मध्ये येतो. 'एकविरा महात्म्य'नसार रण' नावाच्या राजाने पुत्रकामेष्ट यज्ञ केला; पण त्याला 'कमळी' नावाची मुलगी जन्माला आली पढे तिचे जमदग्नीशी लग्न झाल्याचा उल्लेख येतो, तर स्कंदपुराणामध्ये रेणु नावाच्या राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व नंतर त्याला 'आदिती' नावाची मुलगी झाली तीच पुढे रेणुका बनली.

 असे वेगवेगळे उल्लेख येतात; पण यात जरी वेगळी मते असली, तरी रेणुका जमदग्नीशी विवाहबद्ध झाली यात मात्र कुठेही प्रवाद नाही.

 रेणुका लग्नानंतर रोज जमदग्नीसाठी पाणी आणायला जात असे. एकदा ती पाणी आणण्यासाठी गेली असता; तिथे चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियासमवेत क्रीडा करताना तिने पाहिले आणि तिच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ४९ ॥