Jump to content

पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कांबीकर, माया जाधव, सुरेखा पुणेकर वगैरेसारख्या नृत्यनिपुण कार्यक्रमातून लावणी वेगळ्या दमात पेश होऊ लागलीय. सरकारचाही आश्रय तिला मिळालाय. यमुनाबाई वाईकरांच्या सारख्या बुजुर्गांनी परंपरागत जुनी लावणी जपून ठेवली. पुढच्या पिढीपर्यंत पोचवली. पंढरपूरच्या उत्पात घराण्यांचाही लावणी जपण्यात मोलाचा वाटा अहे. लावणीरूपी दैवाघरचं देणं काळाच्या ओघात पदराआड दिवा जपावा आणि तो सतत तेवता ठेवावा, अशा रीतीनं या लोकांनी जपलं. तो खजिना लोप पावू दिला नाही, हे त्यांचे या पिढीवर मोठे ऋण आहे.

 हे लावणीचं लावण्य जपणं ही रंजनाबरोबर जबाबदारी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥४८॥