पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिठात गुळ किंवा साखर घालूनही बनवितात. दसऱ्याच्या दरम्यान नवरात्रात खेड्यात अजूनही घरोघरी अशा कडाकण्या बनवल्या जातात.
 मखराच्या मधोमध विड्याच्या पानाची घटमाळ बांधून कलशावर सोडतात. काही वेळा झेंडू वा मखमलीच्या फुलांची ही माळ अशी कलशावर सोडली जाते.
 आणि हा विधी मांडून पूर्ण झाला, की गोंधळी दिवटी पेटवतो. जुन्या कापडी चिंध्या टोकाला बांधून त्यावर तेल घालून ही प्रज्वलित केली जाते.
 हा गोंधळ घालणारे जे गोंधळी असतात ते संख्येने शक्यतो चारजण असतात. त्यांचा खास वेष असतो अंगात अंगरखा, खाली धोतर, गळ्यात कवड्यांच्या माळा, डोक्याला पगडी, बरोबर संबळ, तुणतुणं असतं.
 खरं तर गोंधळ हे एक प्रकारचं नृत्यनाट्यच असतं. तालासुरांच्या साह्यानं गीत म्हटलं जातं. लोकसंस्कृतीतल्या इतर गीतांप्रमाणेच गोंधळातली काही खास गीतं आहेत. तसा हा खास देवीच्या पूजनाचा विधी असल्यामुळं देवीसंबंधीत गीतं यात आहेतच; पण गोंधळासाठी सर्वच इतर देव-देवतांनाही गोंधळी आमंत्रित करत असतात. या गोंधळाचा प्रारंभ गणाने होतो. यातही गणेश वंदनाला महत्त्व आहेच.

मोऱ्या गणपती रे गणराजा।
किती विनवू तुला महाराजा
तेत्तीस कोटी देवदेवता।
सर्वा आधी गणनायका।
दैत्य मारून केलिस दशा।
लावले पळवून धाही दिशा॥
किती विनवू तुला म्हाराजा॥

 गणेश वंदन झाले, की देवीची स्तुती चालू होते. देवदेवतांना गाण्यातून निमंत्रण चालू होतं. जण या सर्व देवदेवतेच्या साक्षीनं गोंधळ्याला देवीचा गोंधळ उभा करायचा असतो.
 गोंधळी संबळ- तुणतुण्याच्या तालावर देवीचा गोंधळ मांडला आहे, म्हणत देवांना निमंत्रण देऊ लागतात.

मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडीला
उदे उदे गं अंबाबाई गोंधळा ये
मोरेश्वर गणा गोंधळा ये
तेहतीस कोटी देवा गोंधळा ये

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १३९ ॥