पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आई भवानी गोंधळा ये ...

 लग्नं पार पडली, की त्याच घरातून गोंधळाला या बरं का, अशी आमंत्रणं यायची. लग्नानंतर आणि मुंजीच्या नंतरही 'गोंधळ' हा कुलाचार अजूनही सगळीकडे पाळला जातोच. लग्न झाल्यावर नवरा-नवरी पूजेला बसून 'गोंधळ' कुलाचार विधी असतो. बऱ्याच वेळा एखादं कार्य सुफल होऊ दे म्हणून देवीला तुझ्या नावाचा गोंधळ घालीन' असा नवसही बोलला जातो आणि मग कार्यसिद्धी झाल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी गोंधळ विधी केला जातो.
 यासाठी जे खास देवीभक्त लोक ज्यांना 'गोंधळी' म्हणतात, त्यांना पाचारण केलं जातं. हे गोंधळी लोक तुळजापूरची तुळजाभवानी आणि रेणुकादेवीचे उपासक असतात.
 रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात गोंधळाची प्रथा कशी उगम पावली, हे सांगताना म्हटले आहे, की परशुरामाने बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर त्याचे मुंडके तोडले. ते मुंडके परशुराम आपली माता रेणुकेला दाखवायला आला; पण त्या वेळी त्याने त्या मुंडक्याच्या ब्रह्मरंध्रातून शिरांचे तंतू ओवले जेणेकरून त्यांचा 'तिंतृण तितृण' असा आवाज येऊ लागला. बेटासूराच्या धडाचे आणि शिराचे चौंडके वाजवून परशुरामाने आई रेणुकेला वंदन केले. त्यातून या गोंधळाची प्रथा निर्माण झाली असावी.
 प्राचीन काळच्या भूतमाता देवतेशी याचा संबंध काही ग्रंथांतून जोडला जातो.
 माहूर माहात्म्याविषयीच्या ग्रंथातही रेणुकेच्या उपासनेमध्ये ‘गौंडली नृत्या'चे वर्णन येते, ते गोंधळाशी साधर्म्य असणारे आहे. गोंधळाच्या विधीमध्ये ठरावीक पद्धतीने गोंधळाची मांडणी केली जाते. प्रथम एक चौरंग किंवा पाट घेतला जातो. त्यावर एक नवीन वस्त्र अंथरले जाते. त्यावर गोंधळ्यातलं नाईक म्हणवणारा प्रमुख तांदळाचा चौक भरतो, त्यावर सुशोभित दिसेल असे हळदीकुंकू घालतो. या चौकाच्या चारी बाजूचे कोपरे असतात. तिथं चार नारळ किंवा खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळी फळं, खारीक, हळकुंड, सुपारी हेही ठेवलं जातं. या तांदळाच्या चौकामध्ये कलश स्थापन केला जातो. एका तांब्यात विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यात नारळ ठेवतात. तांब्यावर हळदी-कुंकवाच्या रेषा काढतात. तांब्यातल्या पाण्यात सुपारी, नाणं टाकतात.
 हा चौक सजल्यानंतर चौकासमोर भाताचे उंडे ठेवून त्यावर कणकेच्या पाच पणत्या वा दिवे करून ठेवतात.

 या पाटाभोवती उसाच्या किंवा शाळूच्या ताटाचे मखर उभे करून त्याला कडाकण्या टांगतात. या कडाकण्या म्हणजे गव्हाच्या पिठात साखर घालून बनवलेल्या असतात. काही ठिकाणी डाळीच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। १३७ ॥