पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनेकविध नाना लीलांनी तो आपलं चित्त हरपून टाकतो. त्यामुळं मराठी माणसाचं भावजीवन 'गौळण ' ही व्यापून टाकते. त्याच्या मनावर गारूड करते.
 खरं तर काहींच्या मते गाथासप्तशती व जयदेवादि कवींची 'गीत गोविंदा' सारखी काव्ये आहेत, मी मराठीत ज्या गौळणी रचना आहेत. मग त्या संतांनी केलेल्या असतो व शाहिरांनी केलेल्या असतो, ती त्यांची मूळ प्रेरणास्थाने असावीत. मराठीत ज्या राधा-कृष्णविषयक रचना ज्यात शृंगारभाव आहे, मधुराभक्ती आहे त्या 'गौळणी' नावाने प्रचलित झाल्या आहेत. प्रेमभावना ही सर्वसामान्य मनुष्याला व्यापून राहिली आहे. ती जेव्हा राधा-कृष्णाच्या रूपानं साकार होते तेव्हा माणूस भुलून जातोच. कारण ती त्याला सहज समजणारी असते. इथं ती आध्यात्म्याचं दुर्बोध वाटणारं अवगुंठन वापरत नाही. शृंगार हा सर्वांनाच आवडतो; पण तो जेव्हा राधा-कृष्णाच्या रूपानं गौळणीतून साकार होतो, तेव्हा तो भक्तीचं टोक धरून असतो, संयमित असतो.
 मराठीमध्ये जी गौळण रचना आहे, ती वैविध्यपूर्ण आहे. काळाच्या ओघात जी राजकीय, सामाजिक परिवर्तने घडत गेली, त्याचंही प्रतिबिंब तिच्यात उमटत गेलं. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या गौळणी आणि नंतर होनाजी बाळा, परशुराम यासारख्या शाहिरांनी लिहिलेल्या गौळणी पाहिल्या, की ते ध्यानात येतं. संतांच्या गौळणी रचनेत त्या-त्या संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जाणवून येतो. म्हणजे ज्ञानेश्वर जेव्हा गौळणीची रचना करतात तेव्हा,

सावळी प्रतिमा घेऊनि सुकूमार
खेळत सुंदर गोकुळी रया।।
त्या रूपे वेधिलें काय करूं माये।
अवघे निर्गुणीच होय पाचारीता॥२॥

 असं ते म्हणतात. कुठेतरी यात ज्ञानदेवांची योगानुभवातून निर्माण काव्यसृष्टी जाणवते, तर नामदेवांच्या गौळणीमध्ये एक भाववेडेपण आहे.

रात्री काळी, घागर काळी
यमुनाजळे ही काळी वो माय॥१॥
बुथ काळी बिलवार काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय॥२॥
मी काळी कांचोळी काळी
कांस कांसिली ते काळी वो माय॥३॥
विष्णुदास नाम्याची खामिणी काळी।
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय॥४॥

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२९ ॥