पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वारियाने कुंडल हालें

 खेड्यात दर आठवड्याला कुठं ना कुठं भजनाचा कार्यक्रम असायचाच. कधी कोणाच्या घरी, कधी एखाद्या देवळात. माणसं जेवणखाण संपवून रात्री एकत्र जमायची. कोणी पेटी वाजवायचं, कोणी तबला. टाळ मात्र बऱ्याच जणांच्या जवळ असायचे आणि मग एकापाठोपाठ एक अभंग म्हणणं सुरू व्हायचं. मृदंग वाजवणारंही कोणीतरी असायचंच आणि काही वेळानं कोणीतरी म्हणायचं, 'म्हणा रे एखादी गौळण कुणीतरी' आणि मग थोडं सुस्तावलेलं वातावरण तरतरल्यासारखं व्हायच. आता काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार, अशा अर्थानं आम्ही पोरंही डोळ्यांवरची झोप बाजूला सारून तिथल्या तिथे सावरून बसायचो आणि मग कोणी तरी 'गौळण' म्हणू लागायचं,

वारियाने कुंडल हाले। डोळे मोडित राधा चाले॥धृ॥
राधेला पाहुनी भुलले हरी। बैल दोहितो आपुले घरी॥
फणस गंभीर कर्दळी दाट। हाती घेऊन सारंगपाट॥
हरीला पाहुनी भुलली चित्ता। मंदिरी घुसळी डेरा रिता॥
मन मिळालेसे मना। एका भुलले जनार्दना॥
वारियाने कुंडल हाले॥धृ॥

 राधेच्या त्या भावाने जणू श्रोतृजनही तल्लीन व्हायचा. राधेचं चालणं, कृष्णावर भुलणं, कृष्णाच्या ओढीनं सैरभैर होणं, हे सगळं त्या गौळण गीतातून सामोरी यायचं. डोळ्यांसमोर साकार व्हायचं. मराठी माणसाच्या मनावर भूल घालायचं. अभंग हा मराठी माणसांना आवडणारा प्रकार. त्यातूनही भावमधूर, आर्त भाव प्रकट होतो, तरी या अभंगाबरोबरच आपल्या बऱ्याचशा संतांनी गौळणीची रचना केली आहे.

 या गौळणींची रचना पाहिली, की जाणवतं यात परमेश्वराशी एक खाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात मुग्धशृंगार आहे; पण मधुराभक्तीही आहे. लौकिक प्रेमाचा उत्कट साक्षात्कार या गौळणीमधून दिसतो. अभंगामधील परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार असतो. बराचसा अव्यक्त असतो; पण गौळणीतून जणू तो माणसाच्या समोर साकार होतो आणि सामान्य भावभावनांशी एकरूप होतो. त्याच्याशी भांडता येतं, रूसता येतं, तक्रार करता येते. त्याच्याशी वात्सल्य भावानं सामोरी जाता येतं. त्याच्याविषयीचे मुग्ध शृंगारभाव व्यक्त करता येतात. कधी मग तो सखा बनून साथ देतो. सुख-दुःखाचा सोबती बनतो. कधी माऊली बनून वात्सल्यमिठी घालतो, कधी शृंगारभाव व्यक्त करणारा प्रियकर बनतो. त्याच्या रंगात तो रंगवून टाकतो, तर कधी आपलंच छोटं मूल बनून त्याच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२७ ॥