पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दार उघड बया! दार उघड...

 लहान असताना रस्त्यावर कडकलक्ष्मीच्या डफाचा कडकडाट ऐकू आला, की आम्ही अंगणातून घरात पळायचो. खरं तर त्या वेळी तिच्या त्या रूद्ररूपाची भीती वाटायची. लांब केस, कपाळाला हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेभोवती हिरवे जरीचे खण, त्यात काही चोळीचे खणही असायचे. कंबरेला घुगरांची माळ असायची. तालबद्ध नाचताना ती घुगरं वाजायची, पायात मोठे जाड, मध्ये पोकळ असलेले पितळी वाळे. त्यात खडे असल्याने चालताना त्याचा आवाज यायचा. कंबरेच्यावरचे काळेशार पाठ-पोट मात्र उघडेच असायचे. ओठावर मिशाही असायच्या. ते सगळं दर्शनच उग्र असायचं. कडकलक्ष्मीलाच ‘पोतराज' म्हणतात, हे थोडं मोठं झाल्यावर कळलं; पण खेडोपाड्यांत बोली उल्लेख 'कडकलक्ष्मी' असाच करायचे. आषाढात पाऊस कमी झाला, की बऱ्याचवेळा मंगळवारी किंवा शुक्रवारी पोतराजाची फेरी गावात व्हायची.
 या पोतराजाबरोबर पाठीमागे डोक्यावर मरिआईचा देव्हारा घेतलेली स्त्री असायची. पोतराजाच्या हातातल्या डफाच्या तालावर ती तिथल्या तिथं डोलल्यागत देव्हाऱ्यासह नाचायची. शक्यतो हे दोघं एखाद्या चौकात, देवाच्या देवळासमोर किंवा वाड्याच्या मोठ्या चौकातही थांबायचे आणि मग पोतराज देवीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं देवीशी मोठमोठ्यांदा बोलणं सुरू व्हायचं. ते चालू असताना डोक्यावर देव्हारा घेतलेली स्त्री हातात डफडे घेऊन वाजवू लागते. त्या आवाजाने हळूहळू आजूबाजूच्या आयाबाया लेकरेबाळे जमा होऊ लागतात. पोतराजाच्या अंगात संचार झाल्यासारखा तो पाय नाचवत पायातल्या वाळ्याचा व कमरेच्या पुंगराचा आवाज करून नाचायला लागतो आणि मग हातात कोरडा किंवा आसूड घेतो त्याला 'कडक' असंही म्हटलं गेलं आहे. हा तीन-चार फुटांचा कोरडा हातात घेऊन गरगर फिरवायला लागतो. तो असा गोल फिरवायला लागला. की भोवतालची गर्दी चार पावलं मागं सरकायची. हा कोरडा वाद्याच्या तालावर तो न पाठीवर मारून घ्यायचा. त्या मारून घेतलेल्या कोरड्याचा फट् फट् आवाज यायला लागला, की सगळ्या लहानांना विस्मय व थोडी भीती वाटायची. हे कोरडे मारून घेताना तो देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी साद घालत राहायचा.

बया! दार उघड, दार उघड
मरिआई बया! दार उघड...

 त्या बंद दरवाजाच्या समोर मोठमोठ्यांदा त्याची ही आळवणी चालू असायची. आजूबाजूला आता गर्दी वाढायला लागलेली असायची. काहीजण कडकलक्ष्मीच्या म्हणजेच पोतराजाच्या अंगात

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११९ ॥