पान:लोकहितवादी.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी यांच्या चरित्रांतील ठळक ठळक गोष्टींचा परिचय आतांपर्यंत वाचकांना मी करून दिलाच आहे. या गोष्टींचे वर्णन करीत असतां आरंभी गोपाळराव जन्मले त्या संधिकाळांतील अस्ताला जाणाऱ्या परिस्थितीचे क्षणोक्षणीं पालटणारें स्वरूपच विशेषतः मी आपल्या डोळ्यांपुढे ठेविले होते. उदयोन्मुख परिस्थितीचे त्यावेळी नुसतें दिग्दर्शन केलेले होते. यापुढे गोपाळरावांचे चारित्र्य, त्यांचे विचार, त्यांची मते यांचे विवेचन करितांना तेवढ्यानेच भागणार नाही. ज्या परिस्थितींत ते वाढले, त्यांची मते बनलीं, त्यांच्या कर्तृत्वाला आरंभ होऊन त्याचे स्वरूप व दिशा ही ठरली त्या परिस्थितीची जास्त स्पष्ट कल्पना वाचकांना करून देऊन परिस्थिती व तिला अनुरूपे तयार होणारी मते यांची जोडणी करून दिली पाहिजे. म्हणून गोपाळराव तरूण होते त्या काळच्या परिस्थितीचे या दृष्टीने पुन्हा एकदां थोडक्यांत विवेचन करितो. __ इंग्रजी अंमल या देशांत निरनिराळ्या वेळी बसला. तसेच त्याचे निरनिराळे प्रकारही झाले.बंगाल,मद्रास या प्रांतांतून म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्या अगोदर पासूनच परकी राज्ये होती व राजसत्ता निर्बल झाल्यामुळे बेबंदशाहीचा अनुभव प्रजेला आला,त्या ठिकाणी एक परकी राज्य गेलें व दुसरें आलें या पलीकडे कोणालाही काही वाटले नाही. नवीन आले त्यामुळे मुलुखाचा बंदोबस्त झाला व लोकांना सुखसमाधान वाटावयास लागले. अशा प्रांतांतून लोकांचे जे नैसर्गीक पुढारी होते, जमीनदार, पाळेगार, देशमूख वगैरे होते, त्यांचे कर्तव्य ओघानेच ठरलें. नवीन आलेले स्वीकारावें, त्यांचीच कास धरावी; नवे ते चांगले व आपण जित असल्यामुळे जे त्यांचे ते सर्व चांगलेच असले पाहिजे असा विचार करून ते मार्गाला लागले. बंगाल, मद्रास या प्रांतांत इंग्रजी