पान:लोकहितवादी.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. चांगला बसल्यापासून इनामें, जहागिरी, वर्षासनें, सरंजाम, इत्यादी देणग्यांची, पुणे दरबारांत नोंद जेव्हांची तेव्हां केली जात असे. ही नोंद पेशव्यांच्या हुजूर रोजकीदींत दफेत्यांत होई व त्या ठिकाणी इनाम किंवा वर्षासन, काय असेल तें, कोणाला दिले, कधी, कां, कशाकरितां, वगैरे सर्व गोष्टींची माहिती दिलेली असे. पुष्कळ इनामें फंदफितूर वगैरे कारणांनी जप्त होत असत असेही दाखले आहेत. नानांच्या मृत्यूनंतर फडाची शिस्त मोडली, मामलती मक्त्याने जाऊं लागल्या, कमावीसदार, सुभेदार, आपापल्या प्रांतांत स्वतंत्रपणाने वावरूं लागले; दरबाराकडून त्यांचा बंदोबस्त किंवा वेळप्रसंगी त्यांची कुमक होईनाशी झाली, त्यामुळे प्रांतोप्रांती देशपांडे, देशमूख, पाटील अशी वतनदार मंडळी पुंड होऊन गांव, मुलूख, गड बळकावून बसली. होळकरांनी केलेल्या पुणे शहराच्या लुटीच्या वेळी सरकारचे पुष्कळच कागदपत्र नाहीसे झाले असतील. त्याचप्रमाणे त्या बेबंदशाहीत पुष्कळांनी खरेखोटे कागद केले असतील, ही गोष्ट अगदी संभवनीय आहे. पेशव्यांच्या वेळी देखील अशा प्रकारचे घोटाळे वेळप्रसंगी होत नसतील असें काही म्हणता येणार नाही. मध्ये मध्ये पुण्यास ज्या बारभाईंच्या उलाढाली झाल्या त्यावेळी असा प्रकार बराच झाला असेल-झाला होताही. पण नवे धनी गादीवर आले म्हणजे दर वेळी पुन्हां एकदा इनाम सरंजामांची तपासणी होई व प्रत्येक वेळी, चुक्या, लबाड्या वगैरे असत त्या दरुस्त होत असत. पेशवाई अखेर असे काहीतरी होणे साहजीकही होते; व त्याच वेळेला तें सरसहा व कायदेशीरपणाने झाले असते तर पुढे जी इनामांसंबंधी इतकी ओरड झाली ती झालीही नसती. त्यावेळी नवीन मुलखाची व्यवस्था करणारे कमिशनर एल्फिन्स्टन यांच्या लक्षांत ही गोष्ट आली होती. परंतु नवीन मुलुखांत बंदोबस्त करणे, शांतता स्थापन करणे वगैरे जास्त महत्त्वाच्या कामांत