पान:लोकहितवादी.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनीक कार्याचा ओनामा. इत्यादी लोकोपयोगी चळवळीत गोपाळराव सवडीप्रमाणे पडत असत. त्या वेळच्या सर्वच चळवळी सामाजीक किंवा शिक्षणविषयक असल्यामुळे सरकार व लोक असा विरोधाचा प्रकार त्या ठिकाणी नव्हता. व त्यामुळे एतद्देशीय सरकारी नोकर चळवळींत पष्ठत इतकेच नव्हे, तर वरचे युरोपियन अधिकारी देखील शक्य तितके प्रोत्साहनच देत असत. पुणे येथे एक वाचनालय स्थापावे अशा प्रकारची चळवळ येथील न्यायाधीश ब्राऊनसाहेब, व गव्हर्नर साहेबांचे चिटणीस कॅप्टन् फ्रेंच साहब, यांच्या प्रोत्साहनाने सन १८४७ साली चालू झाली व तिला मूर्त स्वरूप येऊन एका वर्षाच्या आंत The Poona Native General Library नांवाची संस्था १८४८ साली स्थापनही झाली. त्याप्रमाणेच सन १८४०च्या सुमारास विष्णुशास्त्री बापट या गृहस्थांनी पुण्यात पहिल्याने पुनर्विवाहाला अनुकूल असें मत प्रतिपादन करण्यास सुरवात केली होती व या विषयाची चर्चा त्या वेळी पुण्यात चालू होती. अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टींचे निरीक्षण मार्मिकपणाने गोपाळराव करीत होते. सन १८४८ साली " प्रभाकर" नावाच्या पत्रांत शंभरांवर पत्र लिहून पुणे येथील महाराष्ट्रीय समाजांतील चळवळींची माहिती त्यांनी दिली आहे. व त्याचप्रमाणे तत्कालीन समाजांतील व्यंगे व दोषस्थळे दाखवून त्यांवर चुरचुरीत टीकाही केली आहे. या पत्रांमुळे पुण्यातील पुराणमताभिमान्यांचा त्यांच्यावर बराच रोष झाला असावा असे दिसते. या रोषाला, व तज्जन्य कुत्सित टीकेला शेवटच्या पत्रांत उत्तर देऊन त्यानी या शतपत्रांचा समारोप केलेला आहे. हीच पत्रे पुढे ३० वर्षांनी ग्रंथरूपाने एकत्र छापून निघाली व निबंधमालाकारांच्या रोषाला पात्र झाली; तो एक स्वतंत्र कथाभागच असल्यामुळे त्यांचे विवेचन पुढे करण्याचे अभिवचन देऊन तूर्त चरित्राकडेच वळतो.