पान:लोकहितवादी.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालपण. होत. त्यांच्या बालपणासंबंधाने थोडीच पण विश्वसनीय व मनोरंजक माहिती त्यांच्या घरच्या कागदपत्रांतून सांपडते ही एक सुदैवाचीच गोष्ट समजली पाहिजे. कारण, आमच्या इकडे कोणाचें चरित्र लिहावयाचे झाले तर माहिती मिळत नाही ही अडचण नेहमीच ऐकू येते. पण त्यांतल्या त्यांत चरित्राचा जो नायक असेल त्याच्या लहानपणची माहिती तर मुळीच मिळत नाही. घरचे खाजगी कागदपत्र, दररोजची टिपणे, मित्रांचा किंवा आप्तेष्टांचा पत्रव्यवहार, वगैरे अशा कामाला उपयोगी पडणाऱ्या कागदपत्रांची किंमत आम्हांला कळू लागली नाही. अगोदर अशा प्रकारची टिपणे कोणी फारशी करीत नाही व केलीच तर करणाऱ्याच्या मागें कोनाकोपऱ्यांत पडून, कसरीने खाऊन, किंवा रद्दीच्या गठ्यांतून वाण्याच्या दुकानापर्यंत पोंचून ती नाहीशी होतात. व मग एकादा माणूस मोठेपणीं विद्यनें, कर्तबगारीने, प्रसिद्धीला आला म्हणजे त्याच्या बालपणची आपण चौकशी करूं लागतो. मग व त्यांचे कुलशील मूळपासूनच फार चांगले होते, आईबाप फार सच्छील, पापभीरु होते; मोठेपणाची लक्षणे बाळपणीच त्याच्या अंगी दिसत असत, अशा त-हेची सामान्य विधाने करून आम्ही मोकळे होतो, किंवा विशेष गोष्टी किंवा प्रसंग यांची माहिती दिलीच तर ती इतकी तिखटमीठ लावून सांगतो की, त्यावरून त्या माणसाच्या सामान्य स्वभावाविषयी वाचकांना फारसा बोध होऊ नये. गोपाळरावजींच्या चरित्रासंबंधाने मात्र सुदैवाने तशी स्थिती नाही. ज्या काही दहापांच गोष्टी माहीत आहेत त्या विश्वसनीय अशा आहेत; व त्यामुळे लहानपणची परिस्थिती, स्वभाव, वर्तन, विचार, विकार इत्यादी गोष्टी समजण्याला अडचण पडत नाही. गोपाळरावांचा पिंड लहानपणापासून बळकट होता, शरीराची काठी उंच असून रूप, बांधा या सर्वच गोष्टी सरस होत्या. कपाळ.