पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४९

उपदेश लोकां' अशी टीका मराठी वृत्तपत्रांनी केली ती यामुळेच.
 ४. ईश्वरी योजना आक्षेपार्ह :- यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची इंग्रजांच्या राज्याविषयीची मते. त्यातील दोन मते कोणत्याही दृष्टीने पाहिली तरी आजही आक्षेपार्ह वाटतील अशी आहेत. 'इंग्रजांचे राज्य येथे आले ते परमेश्वरी योजनेने आले.' असे लोकहितवादींनी अनेक ठिकाणी म्हटले आहे, ही गोष्ट अत्यंत विस्मयकारक होय. सर्व घटनांची कार्यकारणभावाच्या दृष्टीने मीमांसा करणाऱ्या या इतिहासपंडिताने 'ईश्वरी योजने'चा विचार मांडावा हे फार खेदजनक आहे. पण जुन्या शास्त्रीपंडितांवर, भटभिक्षुकांवर एवढा गहजब करण्याचे काय कारण होते ? तेही हेच म्हणत होते. 'रावण मत्त झाला तेव्हा परमेश्वराने त्याचा नाश केला. तसेच आता होईल.' ही त्यांची श्रद्धा व 'हिंदू लोकांना ज्ञान देण्यासाठी व शहाणे करण्यासाठी परमेश्वराने इंग्रजांना धाडले व येथले कार्य झाल्यावर तो त्यांना जाण्याची आज्ञा देईल.' ही लोकहितवादींची श्रद्धा यात मुळीच फरक नाही. हिंदू लोकांना शहाणे करावे, असे परमेश्वराच्या मनात होते तर त्याने त्यांनाच बुद्धी का दिली नाही ? इंग्रजांना येथे आणण्याची काय गरज होती, असा प्रश्न कोणाही सुबुद्ध माणसाच्या मनात आला असता, पण लोकहितवादींच्या मनात तो आला नाही, अशा स्थितीत समकालीनांच्या मनात त्यांच्याविषयी शंका येणे अगदी साहजिक होते.
 ५. इंग्रज न्यायी, सत्यप्रिय :- यापेक्षाही आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे इंग्रजांनी हिंदुस्थानचे राज्य न्यायाने घेतले असे त्यांनी त्या राज्याचे केलेले समर्थन ही होय. भारतातील इंग्रजांच्या राज्याच्या प्रस्थापनेचा इतिहास अन्याय, जुलूम, अत्याचार, खोटेपणा, लूटमार, दरोडेखोरी यांनी भरलेला आहे हे आज लहान पोरालाही माहीत आहे. लोकहितवादी त्या काळचे इतिहासपंडित ! आणि त्या राज्यस्थापनेचा इतिहास पाहूनच इंग्रजांनी यथान्याय राज्य घेतले आणि ईश्वराने हे राज्य त्यास अशा प्रकाराने दिले की त्यास कोणी दोष ठेवणार नाही, असे माझे मत झाले आहे.' असे ते सांगू शकतात. (पत्र क्र. ४६) . हे पाहिल्यावर कोणालाही खेद वाटल्यावाचून राहणार नाही. इतिहासाचा अभ्यास करून हे मत दिल्यावर समकालीन पंडितांनी त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी सुद्धा शंका घेतली तर त्यांना दोष कसा देता येईल ? इकडील देशाचे लोकांत वचनाचा प्रामाणिकपणा, खरेपणा, शूरत्व कमी, द्रव्याचा लोभ फार म्हणून इंग्रजांना हे राज्य ताब्यात घ्यावे लागले, असे लोकहितवादी म्हणतात. वॉरन हेस्टिंग्ज, क्लाईव्ह यांची चरित्रे या माहितीच्या समुद्राने वाचली नव्हती काय ? अप्रामाणिकपणा,