पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४८ : शतपत्रे

प्रामुख्याने झाली ती त्यांचे लेखन व त्यांचे आचरण यांतील विसंगतीमुळे. विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी किती हिरीरीने पुरस्कार केला होता, ते वर आपण पाहिलेच आहे. जे या सुधारणेस विरोधी होते त्यांना ते मांग, खाटीक, कसाई असे म्हणत. असे असून प्रत्यक्षात १८६९ साली एक विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास पाठिंबा देण्याचा प्रसंग आला तेव्हा लोकहितवादींनी पळ काढला. या विवाहाला पाठिंबा द्यावा अशा आशयाचे जे पत्रक निघाले होते त्यावर लोकहितवादींनी सही केली होती. या विवाहसमारंभास कुटुंबासह उपस्थित राहावे; वधूवरांबरोबर अन्नव्यवहार करावा किंवा निदान ज्यांनी अन्नव्यवहार केला त्यांना आपल्या पंगतीला घ्यावे व अशा रीतीने आपला पाठिंबा सक्रिय व्यक्त करावा असे लोकांना त्यांनीच प्रार्थिले होते, तरी स्वत: लोकहितवादींनी यातले काहीच केले नाही. त्यामुळेच हे नामर्द आहेत, दंगेखोर आहेत अशी टीका त्यांच्यावर 'इंदुप्रकाश'ने केली. 'लोकहितवादींनी आपला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात केवळ राजकीय भांडवलबाजी केली.' असे 'नेटिव्ह ओपिनियन' या पत्राने म्हटले. 'विविधज्ञानविस्तार'नेही तीन लेख लिहून त्यांचा दंभस्फोट केला.
 परदेशगमनाच्या बाबतीत हाच प्रकार झाला :- हिंदुस्थानची उन्नती होण्यास तो एक प्रमुख उपाय आहे. सिंधुबंदीची ही चाल मूर्खपणाची आहे अशी मते लोकहितवादींनी मांडलेली होती, पण त्यांचे चिरंजीव कृष्णराव विलायतेहून बॅरिस्टर होऊन परत आले तेव्हा त्यांनी त्यांना घरी उतरवून न घेता त्यांची निराळ्या बंगल्यात राहण्याची सोय केली व मग रीतसर प्रायश्चित्त देऊन त्यांना पावन करून घेतले. पुढे पार्लमेंटरी फायनॉन्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी सरकारने त्यांना विलायतेस धाडण्याचा विचार केला तेव्हा 'धर्माच्या व जातीच्या अडचणीमुळे मला विलायतेस जाणे शक्य नाही' असे त्यांनी जाहीर रीतीने उत्तर दिले.
 मूर्तिपूजेवर लोकहितवादींचा मुळीच विश्वास नव्हता :- मूर्तिपूजेच्या रूढीवर त्यांनी शतपत्रांतून टीका केली आहे. पण अहमदाबादेस सेशन्स जज्ज असताना नदीकाठच्या प्रत्येक देवालयात जाऊन दर्शन, पूजन करीत, देवाला गंधफुले वाहात आणि हे सर्व मुलाबाळांना घेऊन करीत. ब्राह्मणांच्या कर्मकांडावर त्यांनी शतपत्रांतून अगदी भडिमार केला आहे. पण स्वतः स्नानसंध्यादी सर्व कर्मठपणा ते रोज आचरीत तो इतका की कृष्णभट पुराणिक हे पुण्याचे वेदविद्यासंपन्न वैदिक ब्राह्मण त्यांना एकदा म्हणालेसुद्धा की, 'अरे गोपाळराव, तुला रे कोण सुधारक म्हणतात ? असे म्हणणारे शतमूर्ख आहेत. त्यांनी आधी येऊन तुझे पाय धरावे अशीच तुझी योग्यता आहे.' 'दंभासाठी करी