पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२ : शतपत्रे

राष्ट्राभिमानाचे व दूरदर्शी व आर्थिक विचारसरणीचे कौतुक वाटू लागते. हिंदुस्थान सधन होत आहे. हे १८३० च्या सुमाराचे बंगाली पुढाऱ्यांचे मत आणि हिंदुस्थान निर्धन व बेकार होत आहे अशी लोकहितवादींनी प्रतिपादलेली विचारसरणी यांतील अंतर बऱ्याच दृष्टींनी बोधप्रत आहे, असे आम्हास वाटते. (आधुनिक भारत- पृष्ठ क्र. ६४-६८), लोकहितवादींच्या आर्थिक विचारसरणीचे महत्त्व कसे अनन्यसामान्य आहे, ते वरील उताऱ्यावरून ध्यानात येईल.
 २. स्वदेशी व बहिष्कार :- हिंदू लोक दरिद्री का झाले याची कारणे सांगताना ते म्हणतात की, या लोकांना उद्योग करावयास नको. ते पराकाष्ठेचे आळशी आहेत. अनेक भट लोकांना त्यांनी सांगून पाहिले की, तुम्ही नुसती कारकुनी करता किंवा जेवण्यासाठी आगंतुकी करता त्यापेक्षा दुसरा काही व्यापार करावा. त्यावर ते म्हणाले की, पेशवाईत आमचे यथास्थित चालले होते. आता चालत नाही. हे इंग्रजांचे पायगुणाने झाले. या सर्व मूर्खपणाची लोकहितवादींना चीड येत असे. म्हणून आपल्या लोकांना ते तळमळून उपदेश करीत असत. 'हिंदू लोकांनी काय करावे ?' या पत्रात ते म्हणतात, 'तूर्त दरिद्र मोडण्यास उपाय असा की, ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाच्या समजुती सोडाव्या व केवळ कारकून आणि भट हे दोनच रोजगार आम्ही करू असे म्हणू नये. मग कोणते रोजगार करावे म्हणाल तर कांच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे, चाबूक, यंत्रे इत्यादी पुष्कळ इंग्रज इकडे खपवतात. ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावे व येथे जो माल खपणार नाही तो दुसऱ्या देशास घेऊन जावा आणि तेथे विकावा. पुष्कळ देश आहेत; या गोष्टीचा शोध करावा व इंग्रजांचे देशचे सामान बंद करावे. किंबहुना आपले सामान त्यास द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. यास्तव आपल्यास जाडी, मोठी, कापडे नेसावयास लागली तर काय चिंता आहे ? परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार राहतील.' (पत्र क्र. ६०)
 या शतकाच्या आरंभी राजकीय चळवळीत स्वदेशी व बहिष्कार (विलायती मालावरील बहिष्कार) यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. कारण इंग्रजांच्या राज्याचे लक्षण म्हरजे आर्थिक शोषण, धनाची लूट हे होय, हे त्या वेळच्या नेत्यांनी जाणले होते. हे जाणून त्याप्रमाणे चळवळ केल्याबद्दल आपण आज त्यांना धन्यवाद देतो. मग त्यांच्या आधी पन्नाससाठ वर्षे तोच विचार, जवळजवळ त्याच शब्दात, लोकहितवादींनी मांडला यासाठी त्यांना किती धन्यवाद द्यावेत !