Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३८५

१. विद्या

पृष्ठ ६६: बुधवारचे वाड्यातील इंग्रजी शाळा
 १८२१ साली पुण्यात विश्रामबागवाड्यात 'संस्कृत पाठशाळा' सुरू करण्यात आली. तिला १८४२ साली इंग्रजीच्या वर्गाची जोड देऊन तिचे रूपांतर इंग्रजी शाळेत करण्यात आले. त्या आधी १० वर्षे सरकारने पुण्यात वेगळी इंग्रजी शाळा काढली. ही शाळा बुधवारवाड्यात होती.

पृष्ठ ६६: त्या ठिकाणी... लायब्ररी सुरू झाली
 ७ फेब्रुवारी १८४८ रोजी बुधवारवाड्यात 'पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी' ची स्थापना केली गेली. दक्षिणेतील सरदारांचे एजंट जे. वार्डन यांची या स्थापनेमागे प्रेरणा होती, तर लोकहितवादी, मोरो रघुनाथ ढमढेरे, आबासाहेब पटवर्धन, पदमनजी पेस्तनजी इत्यादी मंडळींचा स्थापनाकार्यात पुढाकार होता.

पृष्ठ ६७: अज्ञान दूर होण्याचा उपाय पुण्यातच केला असे नाही
 जितांवर केवळ सत्ता चालवावी असे इंग्रजांना कधीच वाटले नाही. आपण सत्ता गाजवीत आहोत त्या समाजाचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना द्यावा, अशी प्रेरणा मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या व इतरांच्याही मनात निर्माण व्हावी, अशी धडपड मॅकिटॉश, एल्फिन्स्टन, माल्कम यांच्यासारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोठ्या कसोशीने केली. या धडपडीतून 'लिटररी सोसायटी' सारख्या संस्था जन्माला आल्या. पुण्यातील लायब्ररीची स्थापना यातूनच झाली. आणि इ. स. १८३८ मध्ये अहमदनगर येथे वाचनालय सुरू झाले तेही अधिकाऱ्यांच्या ज्ञानप्रसारक प्रयत्नांमुळेच होय.

पृष्ठ ६८: बाजीराव पेशव्यांचे अंमलात
 दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत अपराध्यांना अत्यंत अमानुषपणे वागविले जात असे व कमालीच्या क्रूर शिक्षा केल्या जात असत. घाशीराम