Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३७३

त्यांस आपला प्रपंच सावधगिरीने करता येतो. इतके झाल्याअंती याच कायद्याने व याच नियमाने हे लोक राज्य बहुत उत्तम करतील. इंग्रज करतात; पण त्यांस परकीपणा आहे, व स्वदेशीय लोक रोजगार नाही याजमुळे एकंदर भिकारी झाले.
 परंतु हे जर उत्तम झाले, जातिअभिमान सोडून सर्व लोकांचे हितास झटणारे झाले; सर्वांस विद्या करविण्याचा यत्न करू लागले. ब्राह्मण श्रेष्ठ इत्यादी मूर्ख समजुती सोडून राज्य करू लागले, महार, रामोशी, कैकाडी, कोमटीदेखील यांनी सुधारले आणि मोठे कामाचा लायक झाले, तर ईश्वर कृपा करणार नाही असे नाही.

♦ ♦


इंग्लिश सरकार

पत्र नंबर ८९: २० जानेवारी १८५०

 आमच्या लोकांच्या रीती अगदी बदलल्याशिवाय या देशाचे हित होणार नाही व या लोकांस स्वतः राज्य चालविण्याचे सामर्थ्य असल्याखेरीज इंग्रज लोक या देशातून गेले तरी उपयोग होणार नाही. पुन्हा गर्दी होईल व बेबंदी, अंदाधुंदी, भालेराई, होळकरी गर्दी व पेंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील आणि कोणाचा जीव व घरदारही निर्भय राहणार नाही. जो जबरदस्त त्याचे हाती सर्व जाईल व जो निर्बल असेल तो उपाशी मरेल. सर्व त्याचे हरण होईल.
 यास्तव सूज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करू नये. याप्रमाणे सरकार व याप्रमाणे चांगले सुधारलेले लोक हिंदू लोकांस सोबतीस कदापि मिळणार नाहीत. इंग्रजांचे गुण पाहून हे लोक केही तरी शिकतील; परंतु याचे दरम्यान इंग्रज लोक हिंदू लोकांस अगदी भिकारी करू लागले, तरी इंग्रज सरकारशी भांडून ज्या ज्या कायदेशीर तजविजी आहेत, त्या करीत जाव्या. जसे मोठ्या चाकऱ्या हिंदू लोकांस देत नाहीत व हिंदू लोकांशी बहुत भेद ठेवतात. हे मोडण्याचा यत्न केला असता प्राप्त होईल. आणि भेद मोडतील हे साध्य आहे. परंतु अगदी इंग्रजांचे राज्य जाऊन हिंदूचे होणे म्हटले म्हणजे पुनरपि हिंदू लोकांस मूर्ख करणे आहे. अस्तु.