Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२२ : शतपत्रे

खुर्ची, मेज, पिसे व बुके आली म्हणजे आईबाप व शेजारीपाजारी सर्व त्यांस इंग्रजी लिहिणार व शहाणा असे समजतात.
 परंतु वास्तविक पाहिले तर त्यांस वाचल्याचा अर्थही कळत नाही. आणि ग्रंथावलोकन केलेले नसते. इतिहास, विद्या, शास्त्रे यांचा अभ्यास नसतो. इंग्रजी विद्या समुद्रासारखी आहे. परंतु दोन बुके वाचातात आली व चार विरखुड्या आढता आल्या म्हणजे कानावर पागोटे, खिशात रुमाल आणि हातात सोटा असा वेश पुष्कळ घेतात. परंतु त्याने ते विद्वान होत नाहीत. शाळेत शिकलेले सर्व शहाणे आहेत असे नाही.
 "सहस्रेषु च पंडितः" असे कवीने म्हटले आहे. इंग्रज लोकांतील साधारण मनुष्य जरी असला, तरी हिंदू लोकांपेक्षा तो सहस्र गुणांनी श्रेष्ठ आहे व तुम्हास असेही वाटू देऊ नका की, विद्वान नेटीव पुष्कळ जहाले, तर त्यांस मोठ्या जागा मिळणार नाहीत. कारण की, विद्या शिकण्याचे बक्षीस विद्या हेच आहे व ज्ञान हीच शक्ति. मोठे धुरंधर विद्वान शे-दोनशे होऊ द्या आणि मग मोठ्या चाकऱ्या मिळतील किंवा नाही पहा! जर इंग्रज न देतील तर ते विद्वान हरएक प्रयत्ने करून त्या मिळवतील. एकमत हीच शक्ती आहे. शहाणपण असेल, तर पैक्यास तोटा नाही. एक विद्वान झाला असेल आणि त्यांस मोठी प्रतिष्ठा मिळाली नसेल, तर आश्चर्य नाही. कारण की, अशी परीक्षा होत नाही. हे प्रयत्नाचे काम आहे. काळेकरून याचा फायदा होतो. व इंग्रज लोकांस तरी इतबार आला पाहिजे, तेव्हा ते अधिकार देतील. आज नेटीव लोकांचा इतबार मोठा नाही. कारण की, शंभर नेटीव कामगारांस जर दिव्य दिले, तर पाच पार पडतील की नाही न कळे व परकी इंग्रज नेहमी ढेकणासारखे त्यांस चिरडतात. व किती एकाचा फडशा झाला आहे असे जरी आहे, तरी नेटीव कामगारांशी संबंध ठेवतात त्यांस त्यांची कर्मे विदित आहेत.
 नेटीव कामगार याजमध्ये चांगला गुण कोणचा असतो, हे तरी मनात आणा, ते बहुत करून अविद्वान, ढोंगी व लबाड असतात. कोणी मागल्या अवस्था पाहून काही दिवस नीट चालतात; परंतु मग त्याचे मनात असे येते की, आता मला काय भय आहे? मी आता श्रीमंती भोगावयास शिकतो. खर्च तरी कसा निभेल? असा विचार करून पाहिल्याने भयाने व लज्जेने खऱ्याकडून पैका घ्यावयास आरंभ करतात. व एकदा सवय पडली म्हणजे अंगवट्यास पडते. नंतर लिलाव सुरू करतात. म्हणजे जो अधिक बोलेल त्याचा फैसला होतो. अशा तर गोष्टी हमेशा पाहण्यात येतात. डौल करणारे हे लोक असे आहेत की, आपली योग्यता व थोरपणा काही जाणत नाहीत. यांनी कचेरीतून घरी जाताना