शतपत्रे : ३२१
परंतु त्यांस परीक्षक मिळून जसे कवी म्हणतो काकः पिकः पिकः असे करणारे भेटतील, तेव्हा व्यवस्था नीट होईल. साहेब लोक भाषा वगैरे शिकण्याची मेहनत करतात. तशी जर मनुष्य निवडून काढण्याची मेहनत घेतील, तर लोकांचा फार फायदा होईल. बहुतेक ठिकाणी असे आहे की, एखादी जागा खाली झाली तर वेळेस जो उभा असेल त्यात ती देऊन आपली मेहनत चुकवतात. कारण जर बातमी फुटली तर कोणी शिफारशी आणतात व किती एक अर्जी पडतात. तेव्हा त्या वाचावयाची मेहनत कोण करतो? म्हणून तात्काळ भलत्याच एखाद्या शुंभास ती जागा देतात. तेव्हा चांगले लोक कोठून मिळणार? काही दिवस जागा खाली राहून किंवा परीक्षा घेऊन जितके उमेदवार जमतात, तितके जमू देऊन त्यांची नीट चौकशी करून जागा द्यावी. तसे करीत नाहीत. आणि जाग्याची सोडत काढतात. येणेकरून लोकांची अब्रू जाते आणि ठेवणारांचे बुद्धीची प्रशंसाही होत नाही. याचा बंदोबस्त लवकर होईल आणि उगेच कारणाशिवाय ब्राह्मणांचे अब्रूस दूषण लावणार नाहीत, अशी आशा आहे. इंग्रज लोक फार शोधक आहेत. म्हणून त्यांस अवघड नाही. कदाचित येविषयी सरकार लक्ष देईल तर बरे होईल. याजबाबत आणखी काही सूचना पुढे लिहून पाठविण्यात येतील.
♦ ♦
नेटीव अंमलदार
■
पत्र नंबर ९: ७ मे १८(६३)?
आपले मागील पत्री 'एक हिंदु' या सहीचे पत्र छापले होते. त्यात बहुत करून बोभाटाचा मजकूर लिहिला होता. तो सर्व तथ्य नसला, तरी काही खरा आहे.
नेटीव लोकांमध्ये विद्वान मुळी थोडे आणि जे वास्तविक विद्वान व गुणी आहेत, त्यांची प्रतिष्ठा इंग्रज सरकारात होते. एखादे वेळी विरुद्ध गोष्ट झाली म्हणून तेच प्रमाण धरू नये. सामान्यतः वहिवाट असेल ती लिहिली पाहिजे हे एक; दुसरे असे आहे की, इंग्रज शाळेत वगैरे जे लोक अभ्यास करतात, त्यात इंग्रजी लिहिणार असे नाव मिरविणारे पुष्कळ असतात. घरात