पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५२ : शतपत्रे

पाच विषयांचे ज्ञान होते. परंतु आणखी कित्येक इंद्रिये जर असती तर दुसरे कित्येक विषयांचे ज्ञान झाले असते, कारण जितकी इंद्रिये तितकेच ज्ञान.
 जो बहिरा किंवा आंधळा आहे, त्याला चार विषयांचे ज्ञान मात्र होते; रूपाचे किंवा नादाचे ज्ञान होत नाही. कदाचित एक सहावे इंद्रिय मस्तकास किंवा आणखी कोठे असते तर कोणत्या पदार्थाचे किती वजन आहे हे किंवा दुसरे काही पाहिल्याने व त्याचे चलनाने कळले असते. असे कित्येक चमत्कार या सृष्टीत आच्छादित असतील; परंतु पंचेद्रिय मनुष्यास ते ठाऊक नाहीत. असो. तेव्हा हे पांच विषय पांच इंदियेंकरून कळतात, हे उघड दिसते.
 या पांच इंद्रियांचा राजा मन आहे. त्याचा विषय काय, याचा विचार केला असता असे दिसते की, अनुमान करणे हे त्याचा विषय आहे. जसे आपण व्याघ्राची वाणी ऐकली म्हणजे कानांनी शब्दांचा मात्र ग्रह झाला. परंतु हा शब्द कोणाचा याची कल्पना मन करते आणि मागील गोष्टी ज्या पाहिलेल्या आहेत, त्या एकत्र करून तर्क करते की, हा व्याघ्राचा शब्द आहे, हा तर्क चालविणे मनाचा व्यापार आहे. परंतु हा मनाचा तर्क चालण्यास काही तरी दरम्यान पदार्थ पाहिजे, तेणेवरून तर्क चालतो. जर मध्ये काही पदार्थ नसेल तर मनाचा व्यापार बंद होतो. कारण मन जरी विशाळ व अती शीघ्रगती आहे, तत्रापि ते देहामध्ये कैदेत आहे. मनुष्याने देह टाकल्यावर त्याचे मनास जसा व्यासंग असेल आणि कर्माचा अभ्यास असेल तशी गती होईल. पिशाच्च इत्यादिक होतात, हे तरी पापकर्मे करून आपले मनास दूषित करतात.
 देह हा मनास आणि जिवास तुरुंग आहे. स्थूलाचे कारणाने त्याच्या शक्ती आखडत्या आहेत. मनावाचून इंद्रियांचे विषय ग्रहण होत नाहीत व इंद्रियावाचून मनाचे विषय ग्रहण होत नाहीत. जेव्हा इंद्रिये पदार्थ पाहतात तेव्हा पुढे मनाचा तर्क चालतो. ईश्वर आहे किंवा नाही, याचा सिद्धान्त करण्यास मन उपयोगी पडते. या अद्भुत जगाकडे पाहिले म्हणजे तर्क चालू लागतो. परंतु तर्क इंद्रियांचे पाठीमागून चालतो. इंद्रिये जेथपर्यंत जातात त्याचे पलीकडे मनाची उडी पडते. जेव्हा मनुष्य सृष्टी पाहतो तेव्हा त्याचे दृष्टीस एक शेत पडले, अशी कल्पना केली, तर रंगरूप इंद्रियांनी व्यक्त झाली. आणि मनाने इतके सुचविले की, इतका क्रम कर्त्याविना झाला नाही. तेव्हा शोध केला तो एक मनुष्य सांपडला. त्यांस पुसले की, हे शेत कसे झाले ? त्याने सांगितले, बी पेरले होते, त्याजमुळे झाले. तेव्हा आम्ही बी पेरून पाहिले, तो बी पेरले असता उगवते, हा नेम सृष्टीचा आहे. हे संयोगाचे फळ आहे, असे कळले.
 पण एक कल्पना राहिली की, मृत्तिका आणि बीज या जड पदार्थांचा