पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १५१


बुद्धीने ईश्वर किती कळतो त्याविषयी

पत्र नंबर २९ : १० सप्टेंबर १८४८

 ईश्वराने मनुष्यास ज्ञान दिले आहे. तेणेकरून मनुष्याची व जनावराची स्थिती वेगळी दिसते. कारण, जनावरे व मनुष्ये एकदम उत्पन्न झाली असता जनावरे आहेत तशी आहेत. कोणी जनावर असे नाही की ते पहिल्याने रानात रहात होते व आता त्याने गाव वसविला आहे किंवा कापड विकू लागले आहे. परंतु मनुष्य मात्र दररोज अधिक शहाणे होत आहे. आणि मनुष्याचा मोठेपणा सर्व अकलेवर आहे. जर विचार नसता तर पहिल्याने जो मनुष्य झाला, त्याचप्रमाणे अजूनपर्यंत लोक असते. परंतु तसे नाही.
 पूर्वी पाण्याने काळ मोजीत होते. आता घड्याळे झाली. प्राचीन काळी निरोप पाठवीत होते, आता लिहू लागले. नाना प्रकारची शास्त्रे लिहिली, पत्र पाठविण्यास पहिली मुजरद माणसे पाठवीत होते. आता डाक बसली. आणि डाकेचाही उशीर समजून वाफेची गाडी ही सुलभ रीती काढली. अशी मनुष्य दिवसेंदिवस आपले सुखाची वृद्धी करीत आहेत. हा स्वभाव मनुष्याचा आहे. इतर जनावरांचा नाही. याचे कारण त्यांस वाचा नाही, हेच बहुतकरून असावे. किंवा त्याचे मन मनुष्याहून वेगळे रीतीचे असेल. मनुष्य बरेवाईट याचा विचार करणारे जनावर आहे, इतकेच या जनावराचे लक्षण अधिक आहे. बाकी धर्म इतर जनावरांहून यामधे अधिक नाहीत. मरण, जन्म, भक्षण सर्व इतर जीवजंतूप्रमाणे आहे, तेव्हा मनुष्याचे ठाई अक्कल एवढी मात्र अधिक दिसते. हे देणे ईश्वराचे आहे. येणेकरूनच हे जनावर आपल्या उत्पन्नकर्त्यास जाणते आणि सृष्टीकडे पाहून विचार केला तर ईश्वर आहे हे जाणण्यास अवघड नाही.
 कारण मनुष्याचे ज्ञानास साधने दोन आहेत. एक इंद्रिय णि दुसरे मन. इंद्रियाचे धर्म शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श याही करून जड किंवा अजड यांचे ज्ञान होते. जड म्हणजे पृथ्वी इत्यादिक. ज्ञान नेत्रांनी होते. परंतु वायू हा दृष्टीस पडत नाही. कारण तो फार पातळ आहे. यास्तव त्याचे ज्ञान स्पर्शेकरून समजते, तसेच उजेडाचे ज्ञान पाहून होते. कारण त्यांस धरावयास शरीर नाही; परंतु रूप आहे. तसेच एक विण्याची तार वाजविली, तिचा जोराने वायूचा भंग होतो आणि नाद उत्पन्न होतो. तो नेत्रास व शरीरास समजत नाही. कारण रूप नाही व जडत्व नाही. तेव्हा त्याचे ज्ञान कर्णेकरून होते. अशी पांच ज्ञानेंद्रिये आहेत. मला वाटते की, ही पांच इंद्रिये आपणास आहेत, म्हणून