पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : ८

मध्यम मार्ग




लोकशाही म्हणजे अराजक

 तीनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये रक्तशून्य क्रान्ति होऊन लोकशाही प्रस्थापित झाली. त्या वेळीं इंग्लंडच्या हितचिंतकांना चिंता वाढू लागली आणि त्यांच्या शत्रूंना आनंद झाला. कारण हा देश आता दुबळा होणार, त्याचें सामर्थ्य लयास जाणार, त्याला मोठ्या सेना उभारतां येणार नाहीत, आपल्या स्वातंत्र्याचें रक्षण करता येणार नाही व देश अभंग राखतां येणार नाही याविषयी कोणालाच शंका राहिली नव्हती. कारण लोकशाही म्हणजे यादवी, लोकशाही म्हणजे अराजक, बेबंदशाही, लोकशाही म्हणजे दौर्बल्य आणि अंती नाश असे समीकरण स्पेन, जर्मनी, फ्रान्स इत्यादि देशांच्या मनांत ठरून गेलें होतें. इंग्लंडमध्येहि कित्येक लोकांचें मत असेंच होतें; पण लवकरच या भ्रमाचा निरास झाला. १६८८ नंतर इंग्लंडचें सामर्थ्य कमी तर झालें नाहीच; उलट दिवसेंदिवस तें वृद्धिंगत झालें आणि हळूहळू ब्रिटिशांचे साम्राज्य सूर्याच्या मर्यादा ओलांडून जाऊं लागलें. लोकशाही पद्धतीचा अंगीकार करूनहि राष्ट्र बलाढ्य होऊं शकतें, स्वदेशांत समर्थ शासन निर्माण करून फुटीर, अराजकी प्रवृत्तींचा नायनाट करू शकते, परकीय आक्रमणाला तोंड देऊन राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करूं शकते आणि बलाढ्य व राजसत्तांकित देशांना नामोहरम करून जगावर अधिराज्यहि प्रस्थापित करूं शकतें हें ब्रिटनने जगाला दाखवून दिलें. इतके झाले तरी शंभर वर्षांनी अमेरिकेने आपलें लोकसत्ताक स्थापन केलें, त्या वेळी अमेरिकेचे हितचिंतक असेच चिंतातुर झाले होते. त्या वेळीं अमेरिकन वसाहतींनी सर्व देश व्यापला नव्हता. त्यांचा सर्व संसार अलेघानी पर्वताच्या पूर्वेलाच होता, तरी त्याचा