पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २०१

नेहरू यांची यशापयश निरपेक्ष अढळ श्रद्धा आहे. या तत्त्वांमुळेच हिंद व चीन भाई भाई झाले असे आरंभी त्यांनी सांगितले. पुढे चीनने भारतावर आक्रमण केलें, त्याने पंचशील पायाखाली तुडविलें, तरी पंचशील अपयशी झालें असें पंडितजींना वाटले नाही. मनुष्य चुकला तरी तत्त्वें उत्तम तीं उत्तमच असें ते म्हणाले.
 एका वृत्त परिषदेत त्यांनी जाहीर केलें की, चीनचें सोडून द्या. पण जगांत आमच्याच धोरणाचा विजय झाला आहे. आम्ही त्याचें यश गाणार नाही इतकें युरोपीय गातात. शिखर परिषद भरणार आहे, आयसेन होअर मास्कोला जाणार आहे, हा या तत्त्वाचाच विजय आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, ६- ११- १९५९) दुर्देवाने आयसेन होअर मास्कोला गेला नाही. प्रथम निमंत्रण दिले असून नंतर क्रुश्चेव्हने यूटू विमान प्रकरणामुळे तें मागे घेऊन त्याचा अवमान केला. त्यामुळे अमेरिका व रशिया या राष्ट्रांत स्नेहाऐवजी कडवटपणाच वाढत गेला, आणि नंतर शिखर परिषदेचा क्रुश्चेव्हने बोजवारा उडविला. सर्व जगांतील राष्ट्रांच्या प्रतिनिधींची त्याने मानखंडना केली. यामुळे दोन गटांतील राष्ट्रांचें वैमनस्य वाढलेच आहे. अलीकडे कांगो, कटांगा या प्रकरणांत तर जागतिक शांततेचे दूत हॅमरशूल्ड यांचाच बळी पडून आंतरराष्ट्रीय संबंध जास्तच बिघडले आहेत. पण ज्या आधारावर आपल्या तत्त्वांचा विजय पंडितजींनी उभविला होता तो आधार ढासळून पडला तरी पंडितजींच्या मनांतली श्रद्धा ढासळलेली नाही. तत्त्वें विजयीच आहेत ! त्यांना वस्तुस्थितीचा आधार लागत नाही. तीं परब्रह्माप्रमाणे निराधार, निरालंब असतात. गोव्याविषयी आपले धोरण चुकलें असें परवा पंडितजी म्हणाले, पण इतके दिवस तें धोरण अवलंबिलें म्हणून आपल्याला पश्चात्ताप मुळीच होत नाही असें त्यांनी जाहीर केलें. याचेंहि कारण हेंच आहे. इतर राष्ट्रांचीं तत्त्वें राष्ट्रहितासाठी असतात, तर आपली तत्त्वें तत्त्वासाठीच असतात, म्हणूनच देशाची कांहीहि स्थिति झाली तरी तटस्थतेचे तत्त्व आम्ही सोडणार नाहीं असे पंडितजींनी जाहीर केलें आहे.
 आपलें तत्त्वज्ञान हें असें आहे आणि त्यामुळेच भारताला फार भयंकर धोका निर्माण झाला आहे. कम्युनिस्ट दण्डसत्तांचें बळ दर क्षणाला वाढत आहे. तेथील नेत्यांचें परराष्ट्र धोरण रोख व्यवहारी व वास्तव आहे.