पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ असताहि त्यानी इतके अध्ययन केले व उपस्थिति संभाळली याचेच मुळी कोणीहि आश्चर्य करील. पण शास्त्रीबुवाना टिळकांच्या स्मरणशक्तीचे आश्चर्य वाटण्याचे कारण हे की, सूत्रग्रंथ भाष्यग्रंथ हा एकच विषय शास्त्रीबुवांच्या नित्य अभ्यासाचा, उलट टिळकांच्या वाचनाचे व चर्चेचे विषय अनेक असता या क्लिष्ट ग्रंथात अमुक शब्द कोठे आला हे आपणापेक्षा टिळकाना अधिक बिनचूक लक्षात ठेवले हे होय ! संस्कृत विद्येविषयी टिळकाना अभिमान व गोडी असली तरी ज्याला वाङ्मय असे समजतात ते वाचण्याची गोडी टिळकाना तितकी नव्हती. ही गोष्ट त्यांच्या लेखात किंवा भाषणात जी अवतरणे येतात त्यावरून कोणासहि दिसण्या- सारखी आहे. ही अवतरणे सामान्यतः शास्त्रीय ग्रंथातील येत. पण वाङ्मय ग्रंथा- तील म्हणजे काव्य नाटक चंपू यातील सहसा येत नसत. तरी विद्यार्थी दशेत त्यानी वाचलेले शाकुंतल किंवा शिकविलेले मेघदूत अथवा प्रौढपणी अभ्यासिलेले महाभारत यातील येत. याचे कारण हेच की कोणतेहि वाङमय घेतले तरी त्याच्या शब्दसौंदर्यापेक्षा किंवा अर्थसंपत्तपिक्षा तत्त्वाच्या गहनतेकडे त्यांचे लक्ष विशेष असे. टिळकांचा लेखन व्यवसाय पाहिला तर त्यातहि हेच दिसून येते. ते असे की, त्यात बनावट किंवा सजावट अशी काही दिसावयाची नाही. अलंकाराची वेलबुट्टी फारच थोडी. आधाराकरिता वचन घेतले तरी ते ठळक व समर्पक असा- वयाचे. बारीक श्लेष घेतला तरी तो शब्दाचा नसावयाचा तर तर्कपद्धतीतील असावयाचा. त्यांच्या लेखनकलेतील खरां गुण म्हटला म्हणजे लेखातील मुख्य कल्पनेचे चित्र इतक्या स्पष्टपणे व रंगाच्या इतक्या थोड्या हातानी उमटविलेले असे की, ते पाहून मनुष्य कार्याकार्याविषयी निःशंक तर झालाच पाहिजे पण प्रवृत्तीपरद्दि बनला पाहिजे. आणि त्याच्या प्रवृत्तीला आधार म्हणून एखादे शिष्ट- वचन एखादा सर्वसम्मत न्याय एखादे शास्त्रीय सूत्र किंवा नैतिक तत्त्वज्ञानाचा सिद्धान्तहि टिळकानी त्याला पुरवावा. आणि "तूं हा घेऊन निर्भयपणे प्रवृत्त हो" असेच जणु सांगितल्यासारखे त्यांचा कोणचाहि लेख वाचून वाटते. इतर कित्येक लेखकहि आपल्या परीने विवेचक असतात. पण त्यांच्यात्यांच्यात मुख्य फरक असा. ते वाचकाला अरण्याच्या तोंडी भुलवून नेऊन “ यातून पुढे तू आपला मार्ग आपण काढ " असे सांगतात अशी कल्पना केली तर, टिळकांचे लेख वाचून अशी कल्पना सुचते की तेहि वाचकाचा हात आपल्या हातात घेऊन घट्ट धरून ठेवतात व त्याला वाट दाखवण्याकरिता बरोबर घेऊन अरण्याच्या तोंडी जातात, पण तेथे त्याला एकटा सोडून न देता त्याचा हात आपल्या हातात तसाच धरून ठेऊन मार्गामार्गातील निवड स्वतः करून पसंत पडलेल्या मार्गाने वाच- काला अरण्याबाहेर काढून पुढील रस्त्याला लावून मग आपण मागे फिरतात. टिळकांच्या लेखनपद्धतीचा महाराष्ट्रातील वाचकाना चांगलाच परिचय असल्या- मुळे त्याविषयी फारसे लिहिण्याचे कारण नाही. टिळकांच्या केसरीनेच मराठी भाषा जोरदार शुद्ध व भारदस्त कशी लिहावी हे शिकविले अशी कबुली महा-