पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ ती गोष्ट हि माहित असणारच. टिळकानी त्याना बॅरिस्टर नेमले ते आपल्या धंद्यात निष्णात म्हणूनच. कारण सर एडवर्ड कार्सन म्हणजे ज्यानी शेवटी चिरोल साहेबांचे वकीलपत्र घेतले ते लाभल्यास त्याना वकीलपत्र द्यावे असाहि टिळकांच्या सॉलि- सीटरचा बेत होता ही गोष्ट त्यावेळच्या पत्रव्यवहारावरून दिसून येतच आहे. बरे सायमन साहेबांची भावना इतकी नाजूक होती तर त्यानी अशा राजद्रोही मनु- ष्याचे वकीलपत्र घ्यावयाचे नव्हते. त्याना खासगी भीड थोडीच कोणी घातली होती ! त्यानी फीचे पैसे भरपूर घ्यावयाचे तेवढे घेतले. त्यांतूनहि टिळकानी सायमन साहेबांचा दर्जा जाहीर केला असता तरी त्यांच्या बीदाला काय बट्टा लागला असता? किंवा त्याना कोणी नांवे ठेवली असती ? टिळकांच्या पहिल्या खटल्याच्या अपिलात मि. ॲस्किथ हे टिळकांचे बॅरिस्टर होते व ते त्यावेळीहि प्रधानमंडळात समाविष्ट होण्याइतक्या दर्जाचे होते. पण त्यानी टिळकाजवळ अशा प्रकारचे विचार प्रगट केले नाहीत. येऊन जाऊन सायमन साहेबाना टिळकांच्या राजकीय चरित्राबद्दल आदर नसेल. पण तुम्ही तो आदर मला दाखवा असे म्हणण्याला टिळक त्यांच्याकडे गेले नव्हते. सायमन साहेबांची तरी राजकीय मते सर्वानाच कोठे पसंत होती ? त्यांच्या मतांच्या एककल्लीपणामुळेच त्यांना प्रधान- मंडळ सोडावे लागले. महायुद्धाला मनातून ते प्रतिकूल म्हणून प्रधानमंडळाला आवडले नाहीत आणि लोकानी त्याना देशद्रोही म्हणण्यापर्यंत पाळी आली. अशा मनुष्याने टिळकाना मुद्दाम म्हणावे की ' माझ्या राजकीय मतांचा किंवा दर्जाचा उल्लेख तुम्ही करू नका' हा अतिप्रसंग होय व संभावितपणाहि नाही. अड्डयावरचा गडी हमाली देऊन बोलावून आणावा व त्याने म्हणावे ' मी तुमची हमाली करीन पण माझ्या आडनावाचा उच्चार करू नका, का तर माझ्या कुळाला बट्टा लागतो' असे म्हणण्यासारखेच हे नव्हते काय ? वास्तविक स्वाभिमानी टिळकानी सायमन साहेबाना आपल्या स्वभावाप्रमाणे खरमरीत उत्तर लिहून झाडलेहि असते. पण कोणी तरी संभावित राहिले पाहिजे म्हणून टिळकानी संभा- वितीचा कमीपणा आपणाकडे घेतला आणि वरील प्रमाणे मऊ शब्दाने उत्तर लिहिले, 'ज्या येई लघुता न अन्य सदनी ऐसा न कोणीचही ' हीच म्हण खरी. टिळकानी सर जॉन सायमन याना लिहिलेले आभारप्रदर्शक पत्र वर दिले आहे त्याच्या जोडीला पार्नेल यानी सर चार्लस रसेल याना अशाच प्रसंगी लिहिलेले आभार प्रदर्शनाचे पत्र वाचण्यासारखे आहे म्हणून ते खाली देतो. व ती दोन्ही एकत्र वाचली असता त्यातील फरकाचे मर्म कळून येईल. पार्नेलचे सर चार्लस रसेल यास पत्रः - "कामिशनचे काम फार दिवस चालले. कंटाळवाणे झाले, तरी एकंदरीने माझे हित व आमचा मुकदमा या बाबतीत तुम्ही जी निष्ठापूर्वक मेहनत केली त्याकरिता तुमचे व अस्किथ साहेबांचे मी कृतज्ञता- पूर्वक आभार मानतो. आमचे हेतु आमची कृत्ये व आयरिश इतिहासातील एका कठिण प्रसंगी ज्या चळवळीत आम्ही समरस झालो होतो ती चळवळ या