पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारी कोणतीही लैंगिक स्वरूपाची कृती किंवा शिवीगाळ किंवा अपमान करणे किंवा इतर कोणतीही लैंगिक स्वरूपाची स्वागतार्ह नसलेली वर्तणूक करणे, मुलांचा लैंगिक वापर करणे.

 यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, कुठल्या घटनेमुळे त्या स्त्रीला अप्रतिष्ठित वाटते हयाची व्याख्या त्या स्त्रीने जी केली असेल तीच मान्य करायची आहे. एखादी कृती 'अ'स्त्रीला लैंगिक अप्रतिष्ठा देत असेल तर 'ब' स्त्रीला तसे वाटत नसेल, तर 'अ' चेही बरोबर आणि 'ब' चेही बरोबर. त्यांचे एकामेकींचे नियम स्वतंत्रपणे दोघींना लावायचे, त्याचे मिक्सिंग होणार नाही याची काळजी जाणिवपूर्वक घेतली पाहिजे.

 स्त्रीया लैंगिक अत्याचाराबद्दल मोकळेपणाने बोलत नाही. लहानापणापासून त्या अवयवांबद्दल एवढी झाकापाक केलेली असते की हया विषयावर सार्वजनिक ठिकाणी बोलायचे नसते हेच ती शिकलेली असते. त्या स्त्रीने आपल्याशी मोकळेपणाने बोलावे यासाठी प्रायव्हसी (कम्फर्ट झोन) निर्माण केली पाहिजे. आपण आपले लक्ष तिच्यावर केंद्रित केले पाहिजे. तिच्याकडे सांगण्यासाठी भाषा नसते. त्यातही तिला मदत लागू शकते ती आपण दिली पाहिजे.

कौटुंबिक हिंसाचारा विरूद्ध घराबाहेर पडलेल्या एकूण स्त्रियांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया लैंगिक हिंसाचाराच्या बळी असतात, परंतू त्या प्रमाणात त्यांच्या अर्जात हिंसाचाराच्या प्रकारात लैंगिक हिंसाचाराची नोंद आढळत नाही असे टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या डॉ.निशी मित्रा यांनी त्यांच्या विवाहांतर्गत बलात्कार' या संशोधनात सिद्ध केले आहे. तेव्हा हा विषय किती गंभीर आहे याची जाणिव

आपल्याला आली असेल.

 कौटुंबिक हिंसाचारा विरूद्धच्या कायद्याच्या कौटुंबिक हिंसाचार घटना अहवालात लैंगिक हिंसाचार हा दुसराच मुद्दा आहे. तरि प्रत्यक्ष हा अहवाल भरून घेतांना तो मुद्दा अर्जाच्या शेवटी जेव्हा स्त्री बरोबर आपले मोकळेपणाने नाते तयार झालेले असेल तेव्हा भरून घेतला जावा. पण जर त्या अर्जदार स्त्रीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारा पासूनच बोलायला सुरूवात केली तर मात्र आपणही

मोकळेपणाने तो मुद्दा आधी घ्यावा.

 याशिवाय त्या स्त्रीच्या इच्छेविरूद्ध इतर पुरूषांशी संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करणे, अनैसर्गिक मार्गाने संबंध ठेवणे इ; खरतर तिच्या इच्छेशिवाय केलेली प्रत्येक कृती लैंगिक हिंसाचार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

३. शाब्दिक किंवा भावनिक हिंसाचार – उदा. अपमान, शिवीगाळ, त्या स्त्रीचे चारित्र्य किंवा वर्तणूक इत्यादीवर आरोप करणे, मुलगा झाला नाही म्हणून आरोप करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे इ. शाळा-महाविद्यालये किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जाण्यास त्या स्त्रीला किंवा तिच्या ताब्यातील मुलाला प्रतिबंध करणे, त्या स्त्रीला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे, नोकरी सोडून द्यावी म्हणून


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३०