पान:लाट.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'लाट'च्या निमित्ताने थोडेसे


 हमीद दलवाई मराठीतून साहित्य-लेखन करू लागले, तेव्हा त्यांची फारशी दखल मराठी मुसलमानांना घ्यावीशी वाटली नाही. इतर लेखकांप्रमाणेच त्यांचे लेखन असणार अशी त्यांची समजूत होती. पण हमीदने जेव्हा स्वत: पाहिलेल्या, अनुभवलेल्या मराठी मुसलमानांच्या जीवनावर लिहायला सुरुवात केली तेव्हा ते काहीसे बेचैन झाले.
 वैचारिक आणि ललित असा भेद करण्याची आपल्याकडे प्रथा पडली आहे. त्यांच्यात दुर्लभ्य असा भेद आहे अशी समजूत. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे साहित्य वाचले की, हा भेद किती वरवरचा आणि नकली आहे ते ध्यानी येते. महात्मा गांधींच्या वैचारिक लिखाणात केवढे तरी लालित्य आढळते आणि रवींद्रांच्या ललित म्हणवल्या जाणाऱ्या लेखनात केवढी विलक्षण विचारवत्ता प्रकट झाली आहे, ते पाहून मन चकित होते. हमीदने वैचारिक लिखाण केले तसे ललित लेखनही केले आणि ते दोन्ही प्रवाह सरमिसळ झालेले आढळतील.
 हमीदच्या वैचारिक साहित्याचे वेगळेपण त्याच्या वास्तवाच्या सम्यक आकलनात आणि निर्भय मांडणीत दिसून येते. तीच गोष्ट त्याचे ललित साहित्य वाचतानाही जाणवते. त्याचे मानवी भावजीवनाचे आकलन सम्यक वास्तवावर आधारलेले आहे. तो मुस्लिम समाजात वावरला, वाढला. त्या जीवनातील विविध रसधारा त्याने पाहिल्या, चाखल्या. इतर मुस्लिम लेखकांप्रमाणे आपला समाज वगळून त्याने फारसे लिहिले नाही. त्याच्या काव्यात्म सत्याच्या मुळाशीवास्तव सत्य ठाम उभे असते. त्याने माणसे बेचैन, प्रक्षुब्ध झाली तरी ते वास्तव सत्य नाकारणे कोणालाच शक्य नसते.

 'लाट' हा हमीदच्या कथांचा संग्रह. त्याच्या गाजलेल्या कथांचा या संग्रहात अंतर्भाव केलेला आहे. साधना प्रकाशनाने पानशेतफुटीच्या आधी हा संग्रह प्रकाशित केला आणि दुर्दैवाने त्याच्या प्रती मोठ्या प्रमाणावर वितरित होण्याआधीच तो पाणलोटाचे भक्ष्य झाला! त्यानंतर त्याची एखादी प्रत मिळणेही अवघड झाले. शेवटी मेहरुन्निसा दलवाई यांनी मोठ्या कष्टाने एक प्रत मिळवली व त्यामुळे हे पुनर्मुद्रण शक्य झाले. मंजुल प्रकाशनचे श्री. सुनील अंबिके यांनी प्रकाशनाची जबाबदारी हमीदबद्दलच्या आपलेपणाने उचलली. हमीदने 'इंधन' नावाची एक कादंबरीही लिहिली आहे आणि तीही प्रक्षोभक ठरली आहे. हिंदीत त्या

सात