Jump to content

पान:लाट.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
 हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्याच्या वैचारिक साहित्यात घुसले आहे. वैचारिक साहित्यात जशी त्याची निर्भय सत्यनिष्ठा जाणवते, तशी त्याच्या ललित साहित्यातही आढळते. त्यामुळेच त्याच्या साहित्यात जी काय अभिसरणक्षमता आली आहे ती आलेली आहे. जमातवादी मुस्लिमांच्या तीव्र प्रतिक्रिया त्याच्या दोन्ही प्रकारच्या साहित्याबद्दल झाल्याचे आढळते. ही त्याच्या साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाला मिळालेली अप्रत्यक्ष मान्यताच आहे. त्याच्या साहित्याची मुस्लिमांनाही उपेक्षा करून चालण्यासारखे नाही. एका अर्थाने हा वानवळा आहे. हमीदला आणखी आयुष्य लाभते तर मराठी ललित साहित्यावर त्याचा स्वतंत्र ठसा उमटू शकला असता एवढी ग्वाही द्यायला हे साहित्य पुरेसे आहे.
 मराठी साहित्य आता कुंपणाबाहेर पडले आहे आणि त्यात व्यापकता आली आहे. अवघे मराठी जीवन आपल्या कवेत घेण्याची धडपड चाललेली दिसते. साहित्यावर जात-वंशधर्म-भाषा किंवा यौन यांचे बंधन येते तेव्हा त्याची एकात्म समाज घडवण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते. सर्व समाजघटकांच्या जीवनातील भावभावनांच्या धाग्यांनी साहित्याचे सणंग विणले गेले पाहिजे. हमीद दलवाईचे साहित्य हे या नव्या जाणीवेची चाहूल देणारे आहे. आपण मूढपणाने भाषा, लिपी, पोषाख, नावे यांची निरगाठ निष्कारणच जात-धर्माशी बांधली आहे आणि त्यातूनच दुरावा आणि परकेपण जोपासले गेले आहे. ही निरगाठ सुटली म्हणजे साहित्याला अनेक अंगांनी बहर येईल.
 'लाट' हे हमीदचे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रादेशिक भाषांचा स्वीकार जातिधर्म निरपेक्षपणे केला जाईल तेव्हा त्या त्या भाषांच्या साहित्यात समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिबिंब पडलेले दिसेल आणि त्याने ते साहित्य समृद्ध होईल. जातिधर्माच्या बेड्या तोडण्याच्या कामी हमीदने मोठी कर्तबगारी दाखवली व एक नवी वाट वहिवाटली म्हणून त्याच्या पुस्तकांचे महत्त्व.

-यदुनाथ थत्ते

आठ । लाट