पान:लाट.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच वेळी शेरणं घालण्याचा बेत त्यानं पक्का केला.
 महालक्ष्मी ही गावची देवी. शिमग्यात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. वाजतगाजत चिपळूणच्या बाजारात जाते. तिथं रात्रभर इतर पालख्यांबरोबर शहरभर फिरते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ठाणकावर परतते. याच वेळी देवीला शेरणी घालण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांत कैक शेरणी देवीनं हुडकून काढली होती. अनेकांना देवी प्रसन्न झाली होती. त्यांचं मंगल तिनं केलं होतं.
 शिमगा आला तसे ठाणकावर ढोल बडवले जाऊ लागले. नाच्येपोरे येऊन गावात नाचून गेले. रात्ररात्र तमाशाचे फड होऊ लागले. आणि मग एक दिवस देवीची पालखी ढोलांच्या तालात आणि सनईच्या सुरात नाचत, उडत, वाजतगाजत चिपळूणच्या बाजारात गेली.
 आणि इकडे हसनखाननं रात्रीच्या काळोखात आपल्या गड्याला-विश्राम निवात्यालाबरोबर घेऊन पालखीच्या मार्गातल्या एका चोंडक्यात शेरण्याचा नारळ पुरला आणि तो मोठ्या उत्कंठेनं दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागला.
 रात्रीचा मुक्काम संपवून दुसऱ्या दिवशी पालखी ठाणकाकडे येण्यास निघाली आणि सायंकाळची, चारच्या सुमाराला गावच्या वेशीवर येऊन थडकली.
 हसनखान तिथं उभा होता. बरोबर पुष्कळसे लोकही होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते देवीची पालखी पाहायला आले होते. पालखी पुढे पुढे येत होती. गुलाल उधळला जात होता. तेवढ्यात कुणीतरी पुढे येऊन हसनखानच्या अंगावर गुलाल उधळला. गुलालानं माखलेला हसनखान बरोबरच्या लोकांसह पालखीमागोमाग गावाकडे चालू लागला.
 थोड्याच वेळात गावची शाळा लागली. पुढचा रस्ता खाचरातून नि चोंडक्यातून जात होता. पालखी रस्ता सोडून चोंडक्यात उतरली. हसनखानही मागोमाग जाऊ लागला.
 दोन-तीन चोंडके ओलांडून झाले आणि एकदम काय झालं कुणास ठाऊक! पालखीला खांदा दिलेले जवान मटकन खाली बसले. ढोलांचा नाद बंद झाला. सनईचे सूर मंदावले. धडपडत ते जवान उठले. पण पालखी एकाएकी फार जड झाली! विलक्षण जड झाली. पुढं जाईना! जवान गडी पुन्हा सरसे मटकन खाली बसले. आणि मग ते एकदम उठून उभे राहिले. 'ठिच्योऽऽ बा ठिऽऽ च्योऽऽ'चा एकच गजर झाला. 'ढपाँव ढपाँव' करत ढोल दमदमू लागले. पालखी एकदम वर उडाली आणि पुन्हा जवानांच्या हातावर येऊन चक्राकार घुमू लागली.
 थोडा वेळ हे असं चाललं आणि मग गड्यांनी पालखी खांद्यांवर घेतली. ढोल पुन्हा पहिल्या तालात वाजू लागले. सनईचे सूर बदलले आणि त्यांच्या तालावर पालखीला घेऊन गडी संथ गतीनं साऱ्या चोंडक्यात नाचू लागले.
 बरोबरच्या मंडळीत एकच बोंब उठली. कुणीतरी शेरणं पुरलं आहे. देवीला उमगलं आहे म्हणून ती पुढं जात नाही. आता शेरणं निघाल्याबिगर देवी पुढे ठाणकावर जाणार नाही.

 सगळा जीव डोळ्यांत एकवटून हसनखान हे पाहत होता; ऐकत होता. देवीला ते शेरणं उमगलं आहे हे समजताच बेहोष झाल्यागत तो पालखीच्या घुमण्याकडे पाहू लागला.

शेरणं । ४९