पान:लाट.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेरणं

 हसनखानची शादी होऊन दहा वरसं झाली, अजून त्याला अवलाद होत नव्हती. त्याच्या विसाव्या उमरीत बापानं त्याची शादी करून दिली; आणि तीन वर्षांनी हसनखानची अवलाद न बघताच तो इन्तेकाल झाला. आणि मग उरलेल्या सात वर्षांत अवलाद होण्यासाठी करायचे ते सारे उपाय हसनखान करून चुकला. बायकोला त्यानं नाना प्रकारची दवा खावविली. तिनं बिचारीनं हकिमाची पूड खाल्ली, वैद्याचं चाटण चाटलं, कैक पीर आणि वैद लोकांचे गंडे-दोरे गळ्यात बांधले आणि एका हकिमानं दिलेली तावीजही कमरेला बांधून ठेवली. पण इतकं करूनही हसनखानला मूल झालं नाही. मग मात्र हसनखान नाराज झाला. सदानकदा दुःखीकष्टी दिसू लागला. स्वत:च्या आणि बायकोच्या कर्माला बोल लावू लागला. चारचौघांत ऊठ-बस करणं तो टाळू लागला. हिरमुसला होऊन तसबी-जपमाळ घेऊन पडवीतल्या फलाटीवर गमभीन होऊन बसू लागला.
 त्याची ही हालत बघून चारचौघांना वाईट वाटे. पण उपाय कुणाच्याच हाती नव्हता. अवलाद झाल्याशिवाय हसनखान ताळ्यावर येणार नाही हे सगळ्यांनाच कळून चुकलं, तेव्हा एक दिवस गावातला रहीमखान येऊन त्याला म्हणाला, "एक गोष्ट आता मला तुला सांगायची हाय."
 सचिंत हसनखान सावरून बसत म्हणाला, "काय बाबा?"
 "लेकरू हवा म्हणून तू किती लटपटी केल्योस! आता माजा ऐक."
 "काय?" हसनखानने सावध चित्ताने विचारले.
 "गावच्या लक्सुमीबायला अवंदा शिमग्यात शेरणा घाल. शेरणा निघू दे. अवलाद झाल्याबिगर ऱ्हायची नाय-"
 हसनखाननं कुतूहलानं विचारलं, "पन बोलू काय?"
 रहीमखान उत्तरला, "हां. बोल, हे लक्सुमीबाय, मना लेकरू होवंदे. शेरणा निघताच मी तुज्या नावावर बोकड सोडीन. अनी मूल व्हताच तुला अरपन करीन."

 "बरा!" हसनखान उद्गारला. हातातली तसबीर त्यानं फलाटीवर ठेवली. दोन्ही हात जोडले आणि तो म्हणाला, “हे परवरदिगार, माझी आरजू आता तरी पुरी कर!" आणि मग आपले दोन्ही हात त्यानं तोंडावरून फिरवले. काही तरी पुटपुटत तो आपल्याशीच हसला.

४८