Jump to content

पान:लाट.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगीताच्या सुरांसारखा तिचा तो आवाज त्याच्या कानांत घुमू लागला. त्यातल्या घटनांपेक्षा तिच्या भावनांची उत्कटता तेवढी त्याच्या हृदयापर्यंत जाऊन भिडत होती. मसूदखानच्या प्रेमाने ओलीचिंब होऊन विवस्त्र अवस्थेत ती शहारत असल्याचे दृश्य त्या शब्दांतून त्याच्या मनात प्रकट झाले.
 त्या विचाराने तो शरमिंदा झाला. आणि मग तिच्या प्रेमाबद्दल सांगितलेली कथा त्याला आकलन झाली. मसूदखान व्यापाराच्या निमित्ताने नेहमीच तिच्या घरी जात-येत होता. त्याने तिला पाहिली होती आणि तिच्याशी ओळख होताच तिला मागणी घातली होती. यात वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण काहीच नव्हते. फक्त तीच वेगळी होती, वैशिष्ट्यपूर्ण होती. आणि त्या सामान्य माणसाच्या तकलुपी प्रेमाने अगदीच सामान्य रीतीने बळी पडली होती.
 "हे अगदीच सामान्य झाले!" तो उपरोधाच्या सुरात उत्तरला, “अशी लग्ने नेहमीच घडतात. आश्चर्य वाटते ते तुमच्याबद्दल! तुम्ही कशा तयार झालात?"
 "का बरे?" तिने विचारले. “माझी लग्नाला संमती होती. ते मला आवडले होते. त्यांच्याशी लग्न न करण्यासारखे काहीच कारण नव्हते."
 "काहीच कारण नव्हते?"
 “काहीच नव्हते. निदान माझ्या दृष्टीने तरी मला आक्षेपार्ह वाटणारे त्यांच्यात काहीच आढळले नाही."
 “तुमच्या दृष्टीनं?" तो जोरात म्हणाला आणि हसला. खदखदून हसला.
 "का? त्यात हसायला काय झाले?" तिने चमकून विचारले.
 “तुमच्या दृष्टीने म्हणालात ना, म्हणून हसलो. तुमची दृष्टी निष्पाप आहे, भाबडी आहे, भोळी आहे. अशा दृष्टीला समोरचा मनुष्य वेगळा कसा दिसेल? तुम्हांला त्याआधी मसूदखानची कितीशी माहिती होती?"
 "काहीच नाही!" ती उद्गारली. आणि आपण अनावश्यकरीत्या त्याच्याशी युक्तिवाद करण्यात गुंतून जात असल्याचे तिला जाणवले. त्यातून अंग काढून घेण्याच्या इच्छेने ती म्हणाली, "आणि माहीत असण्याची काही आवश्यकताही मला वाटली नाही."
 “असे कसे?" आपले बोलणे अट्टहासाने चालवीत तो म्हणाला, “ज्याच्याबरोबर आयुष्य काढावयाचे त्याची थोडीफार तरी माहिती-"
 "जाऊ द्या हो." ती चटकन त्याला थांबवीत म्हणाली, "तुम्ही उगाचच हा विषय घोळवताहात!"
 "तुम्हांला आवडत नाही का?"
 "तो प्रश्न नाही. आवडत नाहीही. पण शिवाय तुमच्याशी मी तो चर्चीत बसावे असे काही मला वाटत नाही."

 आणि मग तो गप्प बसला. त्या दिवशी तो विषय तसाच वाढवण्याची उकळी त्याने मनातल्या मनात दाबली. गळ्यापर्यंत आलेले मसूदखानविषयीचे तिरस्काराचे शब्द त्याने आतल्या आत गिळले. त्याने आपला पवित्रा बदलला आणि लागलीच चेहराही बदलून

पराभूत । ३५