पान:लाट.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकला. अजीजीच्या सुरात तो म्हणाला, "तुम्हाला दुखावण्याची माझी इच्छा नव्हती."
 "खरे आहे. मी तसे कुठे समजले?" ती उत्तरली, “पण एवढे मात्र कळून चुकले की, तुमचे माझ्या नवऱ्याबद्दल काही चांगले मत नाही."
 "होय. नाही. किंबहुना फार वाईट मत आहे."
 "होय का? पण त्याचे कारण कोणते?"
 "खास असे कोणतेच कारण नाही. वाईट माणसाबद्दल माणसाचे मत वाईटच होत असते."
 "अर्थात तो वाईट अथवा चांगला असणे हे आपल्या वाटण्यावर अवलंबून असते."
 यावर त्याला पुन्हा गप्प बसावे लागले. तिला उत्तर द्यायचे त्याला यावेळीही जमले नाही. त्याला ती अधिकच गूढ, रहस्यमय वाटू लागली. आणि मग रोज रोज भेटू लागल्यानंतर तिचे वागणे त्याला अधिकच बुचकळ्यात टाकू लागले.
 एक दिवस त्याने तिला विचारले, "तुम्ही पहाटेच्या फिरायला का येता?"
 त्याच्या विचारण्यात काही तरी खोल अर्थ आहे असा तिला तात्काळ संशय आला. ती मिस्किलपणे उत्तरली, “पहाटेची वेळ फिरायला चांगली असते म्हणून."
 "हे एक कारण झाले. दुसरे?"
 "यावेळी सहसा कोणी मला पाह्यचा संभव नसतो म्हणून!"
 "असं? म्हणजे तुम्हाला बाहेर पडलेले कुणी पाहू नये, अशी तुमची इच्छा असते तर!"
 "नाही नाही, असं बिलकूल नाही. तुम्ही मला रोजच पाहता की! तुमच्यांशी मी मोकळेपणानं बोलते. मुंबईला मी एकट्यानं बाहेर पडते. पण या तुमच्या गावात फिरायला असं बाहेर पडणं कुणाला आवडणार नाही."
 "मग काय झाले? लोकांच्या आवडीनुसार तुम्हांला वागायचे काही कारण नाही."
 "होय, पण माझ्या नवऱ्यालाही ते आवडत नाही."
 "असं? म्हणजे तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला दिवसा बाहेर पडायची बंदी केली आहे."
 “असा काही माझ्या म्हणण्याचा अर्थ होत नाही. त्यांना जे आवडत नाही ते मी करीत नाही."
 "तुम्हाला आवडत असले तरी?"
 "हो! मला आवडत असले तरी."
 "पण हा शुद्ध जुलूम झाला!"
 "असे तुमचे म्हणणे! मला तसे वाटत नाही."

 या क्षणी त्याचा संताप अनावर झाला. मसदखानविषयीचा सारा त्वेष त्याच्या मस्तकात भिनला. त्याच्या तिरस्काराने तो वेडापिसा झाला. तो दातओठ खात म्हणाला, "तुम्हांला तुमच्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही. मी काय सांगतो ते ऐका! तुमचा नवरा हा एक बदफैली माणूस आहे, हे तुम्हांला माहीत आहे? त्याने आजवर अनेक लग्ने करून अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी केल्याची तुम्हाला कल्पना आहे? आपल्या बायकांशी तो

३६ । लाट