पान:लाट.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिगेला जाऊन पोहोचली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच वेळी पुन्हा ती आकृती प्रगट झाली. तशीच सावकाश चालत समुद्राच्या दिशेने जाऊ लागली. आणि मग रोज नियमित जाताना त्याला ती दिसू लागली.
 तिच्या केवळ चालण्याच्या ढबीवरून ती मसूदखानची बायको असली पाहिजे हे त्याने ओळखले. एवढी संथ चाल गावातल्या अडाणी बायकांची असणे शक्यच नाही, असे त्याला वाटले. गावातली कोणी स्त्री पहाटेच्या वेळी एकटी फिरायला जाणेही शक्य नाही, याचीही त्याला जाणीव झाली.
 तिच्या मागोमाग तो रस्त्याने चालू लागला. थोडे अंतर ठेवून तो ती कुठे जाते ते पाहू लागला. चालता चालता समुद्राच्या अवाढव्य पसरलेल्या किनाऱ्यावर येऊन थडकला. थबकून तो जागच्या जागीच उभा राहिला.
 मसूदखानची बायको संथ पावले टाकीत थोडी पुढे गेली आणि त्या किनाऱ्यावर एके ठिकाणी समुद्राकडे तोंड करून उभी राहिली. काही क्षण उभी राहून ती तिथेच खाली बसली.
 मुस्तफाखान सावकाश पावले टाकीत तिच्याजवळ गेला आणि तिला न दिसेल अशा बेताने उभा राहिला. तिच्याकडे पाहू लागला. ती आपले पाय पसरून आणि आपल्या शरीराचा भार आपल्या दोन्ही हातांवर मागे टाकून बसली असल्याचे त्याच्या लक्षात आले. पहाटेच्या त्या खाऱ्या, मतलई वाऱ्याने बेभान, रोमांचित झाल्यासारखी ती समुद्राच्या दिशेने पाहत असल्याचे त्याला जाणवले. बसायची ती पद्धतही त्याला वेगळी, अनोखी वाटली. आणि तिची वस्त्रे, ती नेसायची पद्धत, सारेच त्याला वेगळे असल्याचे जाणवले. तिच्या सुसंस्कृतपणाविषयी, नबाबी घराण्याविषयी जे जे काही त्याने ऐकले होते ते ते सारे खरे असल्याचा त्याला पडताळा आला. आणि मसूदखानविषयीचा त्याचा तिरस्कार पुन्हा उफाळून आला. मसूदखानच्या मोहजालात ती फसली जावी या विचाराने तो कासाविस झाला. ती सुंदर, नाजूक स्त्री आपल्या संथ गतीने मसूदखानच्या बाहुपाशात कशी ओढली जात असेल याचे चित्र मनात उभे राहताच तो शहारून गेला.
 त्याला मग तिथे अधिक वेळ थांबणे शक्यच झाले नाही. तो भराभर चालत तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याला पाहून ती चपापून व्यवस्थित बसली. आपले पसरलेले पाय तिने आखडून घेतले आणि आदबीने ती त्याच्याकडे पाहू लागली.
 “अशा आश्चर्याने पाहू नका.” तो तिला म्हणाला, “माझे नाव मुस्तफाखान. या गावातच मी राहतो. पहाटे नेहमी फिरायला येतो. तुम्हांला इथं बसलेल्या पाहून सहज पुढे आलो."
 ती नुसतीच हसली आणि लागलीच गंभीर झाली. त्याच्या बोलण्यावर तिने पुरेसा विश्वास ठेवला नाहीसे त्याला तिच्या चर्येवरून वाटू लागले.
 “आपण मसूदखानच्या पत्नी वाटते?"
 "होय." ती कशीबशी एकच शब्द बोलली.

 "मला वाटलंच!" तो पुन्हा म्हणाला, “आमच्या गावात बाहेरगावची तुमच्याशिवाय

पराभूत । ३३