पान:लाट.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. ती येणार असल्याचे कळले तेव्हा तो रस्त्यावर जाऊन उभा राहिला. इतर गोळा झालेल्या लोकांत मिसळला आणि मोटारीतून उतरणाऱ्या एकेक आकृतीकडे आतुरलेल्या नजरेने पाहत राहिला. मसूदखानबरोबर मोफत यायला मिळाले म्हणून त्याच्या गाडीतून आलेली गावातली फालतूक माणसे एकामागोमाग आधी त्या मोटारीतून उतरली. त्यानंतर मसूदखान उतरला. आता त्याची बायको उतरणार या अपेक्षेने डोळे किलकिले करून तो मोटारीच्या दिशेने पाहू लागला. पण तेवढ्यात मसूदखानच्या गड्यांनी एक डोली आणली आणि नेमकी मोटारीच्या दरवाजासमोर उभी केली. मसूदखानची बायको आत जाऊन केव्हा बसली त्याला कळलेदेखील नाही. डोली उचलली गेली आणि मागून लोक चालू लागले, तिथून निघून गेले.
 आणि अशा रीतीने मसूदखानच्या बायकोला पाहायची त्याची एक संधी हुकली गेली. पाहायलाच जी मिळाली नाही तिच्याशी बोलणार तरी कसे? पण या एका अनुभवाने तो निराश झाला नाही. ती आपल्या दृष्टीस पडावी म्हणून तो आटोकाट प्रयत्न करू लागला. ती नवी नवरी असल्याने गावात कुठे तरी जायला म्हणून बाहेर पडेल या अपेक्षेने ठरावीक रस्त्यावर तो रेंगाळत उभा राहू लागला. मसूदखानच्या घराभोवताली रस्त्याने जाण्यायेण्याच्या मिषाने आणि कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा बेताने तो फिरू लागला. त्याच्या घराच्या ठरावीक खिडक्यांसमोर जाऊन डोकावू लागला.
 पण मसूदखानच्या बायकोचे त्याला दर्शन झाले नाही. ती घराबाहेर पडली नाही. कुणाकडे गेली नाही. कधी चुकूनदेखील कुठल्या खिडकीत उभी राहिली नाही. एवढी शिकलेली, सुसंस्कृत मुलगी त्या घराच्या चार भिंतीतच अडकून पडलेली पाहून त्याचे अंत:करण शतशः विदीर्ण होऊन गेले. ती मसूदखानच्या मोहजालात फसली जावी याचे त्याला अतोनात दु:ख होऊ लागले आणि मसूदखानचा त्याला अधिकच द्वेष वाट लागला.
 काही दिवसांनी मसूदखान एकटाच मुंबईला निघून गेला. त्याची बायको मात्र त्याच्या कुटुंबीयात तिथेच राहिली. त्याने असे एकटे मुंबईला निघून जाणे मुस्तफाखानला खटकले. त्याच्या या कृत्यातदेखील त्याला वेगळा, विचित्र अर्थ भरलेला दिसू लागला. आपल्या स्वैराचाराला तिचे बंधन राहू नये म्हणून त्याने योजलेली ही युक्ती असल्याचे मुस्तफाखानला वाटले.
 त्याला वाटले, तिला भेटावे आणि मसूदखानविषयी सारे सांगून टाकावे. त्याने आजपर्यंत केलेली असंख्य लग्ने, त्याने आपल्या बायकांना दिलेली क्रूर वागणूक, त्याचा बदफैलीपणा, पैसे कमावण्याचे त्याचे वाममार्ग, आपल्या बापाचा त्याने घेतलेला बळी, मुस्तफाखानपाशी सांगण्यासारख्या कितीतरी कथा होत्या. पण तीच भेटत नव्हती. तिचे त्याला दर्शनदेखील होत नव्हते. तिचे नखदेखील त्याच्या नजरेस पडत नव्हते.

 पण अखेर एक दिवस त्याला विलक्षण अनपेक्षितपणे मसूदखानच्या बायकोचे दर्शन झाले. पहाटेच्या वेळी आपल्या पडवीतल्या खाटेवर तो जाग येऊन पडला असताना एका स्त्रीची आकृती रस्त्याने समुद्राच्या दिशेने चालत गेलेली त्याने पाहिली आणि त्याची उत्कंठा

३२ । लाट