पान:लाट.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओअॅसिस


 एका लग्नसमारंभासाठी ती मुंबईहून त्या इवल्याशा गावात आली होती. पण त्या गावातील आडदांड माणसे आणि तिथले नागडेउघडे जीवन तिच्या शहरी मनाला घृणास्पद वाटू लागले. त्यांच्यात मिसळून जाणे, कुणाशी मुक्तपणे बोलणे आणि वावरणे तिच्या प्रकृतीला पेलले नाही. तिथला क्षण नि क्षण त्यामुळे तिला जीवघेणा वाटू लागला. तिथे घालवावे लागणारे दोन दिवस तिला युगासारखे भासू लागले. आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून ती कॉटवर पडून राहू लागली; विमनस्क होऊन गेली. पहिल्या दिवशी संध्याकाळची, अगदीच कंटाळा आला म्हणून ती खोलीबाहेर पडली. त्या ओसाड, भकास ठिकाणी पाहण्यासारखेही काही नव्हते. धुळीने माखलेल्या रस्त्याने त्या दिवशी ती सरळ चालू लागली. अंधार पडेपर्यंत चालत राहिली आणि मग परत फिरली.
 दुसऱ्या दिवशी तिने जरा अधिक मजल मारायचे ठरवले. आदल्या दिवसापेक्षा अधिक लवकर, प्रखर उन्हात ती रस्त्याला लागली. माथ्यावर तप्तता झेलीत आणि कडेच्या जळत्या शेतातून निघालेला, वातावरणात दाटून राहिलेला धूर नाकातोंडात घेत ती चालू लागली. रस्त्याने दोन्ही बाजूंनी उघड्याबोडक्या डोंगरांच्या रांगा आणि उजाड शेते मागे पळू लागली. गरम सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यांनी उडणारा धुरळा तिला लपेटू लागला. रस्त्यावर उभ्या असलेल्या जीर्ण, वठलेल्या वृक्षावरील पिकली पाने भरारा उडत तिच्या अंगावर येऊ लागली. ती चालत राहिली आणि तो धूर, ते डोंगर, ती शेते, तो धुरळा आणि पिकली पाने जणू तिचा पाठलाग करीत राहिली. तिच्या सोबतच चालत राहिली. न बदलणाऱ्या सततच्या त्या दृश्याने पुढे जायची तिला अनावर ओढ निर्माण झाली. ती अधिक भराभर चालू लागली.
 असा बराच वेळ चालत राहिल्यानंतर तिचे पाय भरून आले, दुखू लागले. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. उन्हाने डोके ठणकू लागले. धुराने कोंडमारा होऊ लागला. पण तिची पावले तशीच पुढे पडू लागली.

 त्या डोंगरांच्या रांगा आता मागे पडल्या. भकास वाटणारा प्रदेश अदृश्य होऊन हिरवी झाडे आसमंतात डोकावू लागली. रस्त्याची नागमोडी वळणे लयाला गेली आणि तो सरळ धावू लागला. माळरानावर वरवर चढू लागला. धापा टाकीत ती चढण चढून गेली आणि

२३