पान:लाट.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समोरची आकृती बाजूला सरकल्याचे बघून रसूल भानावर आला. त्याने डोळे फाडफाडून पाहण्याचा प्रयत्न केला. गवत खसखसू लागले आणि पाय ओढीत ती आकृती बाजूस सरकू लागली. तरस-तो तरस होता? रसूलचा किती तरी वेळ त्याने निष्कारण मध्ये फुकट घालविला होता?
 फावडे खाली ठेवून त्याने एक लहानसा दगड उचलला आणि तो तरसाच्या दिशेने भिरकावला. दगड वर्मी लागून तरस केकाटत आणि फरा ओढीत कुंपणापलीकडे होऊन डोंगरावर गेला.
 निश्चिंत मनाने रसूल पुन्हा कबर खणण्याच्या उद्योगाला लागला. आता तो भराभर माती फावड्याने वर फेकू लागला. माती गवतावर पडून तिचा पुन्हा पहिल्यासारखा खसखस आवाज होऊ लागला.
 ढोपरभर कबर आता खणून झाली होती. माती कशी भुसभुशीत आणि कोरडी होती. आणि दफन देताना माती पोकळही राहिली होती. तुडवण्याची लोकांनी फारशी दक्षता घेतलेली दिसत नव्हती. रसूलला त्यामुळे फारसे श्रम पडले नाहीत.
 परंतु कधी त्याला फार श्रम करावे लागत. त्याची दमछाक होऊन जाई. कबर कधी तुडवलेली तरी असायची किंवा मातीच चिकचिकीत असायची. पावसाळ्यात तर फारच त्रास. सगळी ओली माती आणि नुसता चिखल. मिट्ट काळोख. रातकिड्यांची किरकीर सुरू झाली की त्याला नुसते भयाण वाटू लागायचे. कबरस्तानातल्या त्या काळोख्या रात्रीच्या भयाणतेने त्याच्या फत्तर दिलाला कचरवले होते. एकदा मागे फिरवले होते. कधी कधी तो खणायला लागायचा आणि पावसाची झोड सुरू व्हायची. अर्धवट खणलेल्या कबरीत ढोपर ढोपर पाणी साचायचे आणि त्याचे सगळे श्रम वाया जायचे. तशीच माती लोटून त्याला परतावे लागायचे.
 मांडीभर कबर खणून झाली तेव्हा रसूल खणायचा थांबला आणि कबरीच्या कडेवर पाय खाली सोडून बसला. रात्रीच्या गारठ्यातही त्याला श्रमाने घाम सुटला. कपाळावरचा घाम त्याने हाताने पुसून काढला. सावधगिरीने त्याने आजूबाजूला पाहिले. मग वरती चमचमणाऱ्या चांदण्यांकडे पाहिले. वातावरणातल्या गारठ्याची आणि दाटणाऱ्या धुक्याची त्याला जाणीव झाली. कबर खणायचे काम आता संपले होते. अजून पुष्कळ रात्र शिल्लक होती. नुकतीच कुठे मध्यरात्र उलटून गेली होती. लगतच्या रस्त्यावरील बैलगाड्यांची तुरळक वाहतूक आता सुरू झाली होती. त्यांच्या लयबद्ध खडखडाटाने त्या भयाण वातावरणाला थोडी हुशारी आली होती. दोन्ही हात मागे टाकून तो रेलून बसला आणि समोरच्या डोंगराकडे लांबवर बघत राहिला.
 ...तसाच तो बसलेला असताना कधीतरी उजाडून गेले. कफनाचे मातीत बरबटलेले कापड त्याने घरी धूऊन साफ केले. संध्याकाळ झाल्यावर तो ते कापड मारवाड्याकडे घेऊन गेला. मारवाड्याने गुपचूप कापड घेतले आणि त्याच्या हातावर पंचवीस रुपये ठेवले.

 "इतकेच सेठ?' असहाय्यपणे रसूलने विचारले, “एवढ्या मेहनतीचे फक्त पंचवीसच

१० । लाट