पान:लाट.pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नेहमीच्या सरावाने रसूलने कबरेचा उंचवटा साफ केला. खाली वाकून त्याने कबरेची जागा बरोबर चाचपून पाहिली आणि पुन्हा तो भराभर फावड्याने माती उपसू लागला.
 चौफेर पसरलेले ते कबरस्तान शांत होते. मेलेली माणसे शांतपणे तिथे पडली होती; कायमची झोपी गेली होती. पुष्कळांची कधीच माती होऊन गेली होती. काहींचे सांगाडे शिल्लक उरले होते. त्यांच्यावर सबज्यांचे रान माजले होते. त्यांची क्षीण सावट साऱ्या कबरस्तानात ठिकठिकाणी पसरली होती. क्षीणशा चांदण्याने त्या भयाण वातावरणाला अधिक भयाणता आली होती.
 रसूलचे तिकडे लक्ष नव्हते. तो भराभर माती बाहेर उपसत होता; माती गवतावर पडल्याचा खसखस आवाज ऐकत होता. पण खणता खणता तो एकदम दचकला. खणायचे बंद करून तो कान देऊन ऐकू लागला. जवळच कुणाच्या तरी पायांचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. कोणी तरी चालल्यासारखा गवताचा खसखस आवाज जवळ जवळ येऊ लागला.
 चंद्र आता पश्चिम क्षितिजाजवळ गेला होता. केवळ अस्पष्टशा धूसरतेने अंधाराला फिकटता आलेली होती. भांबावून त्याने चौफेर नजर टाकली. दृष्टीच्या टप्यात मावेल तेवढा कबरस्तानाचा भाग घाईघाईने त्याने नजरेखाली घातला आणि त्याला अगदी जवळच कोणी तरी उभे असल्याचे दिसले.
 कसलीच हालचाल न करता तो काही क्षण पुतळ्यासारखा ताठ उभा राहिला. हातातले फावडे त्याने घट्ट धरून ठेवले. वेळ आलीच तर समोर दिसणाऱ्या माणसाच्या कपाळात ते हाणण्याची त्याने तयारी केली.
 समोर कोणी तरी उभे दिसत असूनही आपल्या मागावर कोणी येईल, असे त्याला वाटेना. गेल्या वर्षीच काही लोकांनी असला उपद्व्याप करून पाहिला होता.

 ...नेहमीप्रमाणे दिवसा काढलेल्या कबरीची जागा गुप्तपणे हेरून रात्री तो कबरस्तानात आला आणि भराभर त्याने कबर खणली. माती उपसल्यावर त्याने लाकडाचे ठेवलेले ओंडके वर टाकले आणि प्रेताचे कफन फर्रकन ओढले. इतक्यात त्याला चाहूल लागली. पाच-दहा लोक लाठ्याकाठ्या आणि कंदील घेऊन कबरस्तानात आले. ते अगदी जवळ येईपर्यंत रसूलला काही जाणवले नाही. त्यामुळे तिथून पळायला संधी मिळाली नाही. पण तो भ्याला नाही. कबरेच्या खड्ड्यात तो काही वेळ लपून राहिला. गारगार मुडद्यावर पाय देऊन तो उभा राहिला. ते लोक जवळ येऊन कबरेत डोकावू लागले. रसूलने कफन डोक्यापासून पायापर्यंत पांघरले आणि दणकन उडी मारून तो बाहेर पडला. कफनात लपेटलेली ती आकृती पाहताच सगळ्यांची एकजात बोबडी वळली. त्यांना घाम फुटला, शुद्ध हरपण्याची वेळ आली. बोंबलत ते गावाकडे पळत सुटले. रसूलने मग सावकाश कबरेवर माती लोटली आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावात कोण गोंधळ उडाला. गावच्या एका बाजूला असलेल्या या कबरस्तानात जाऊन खऱ्या-खोट्याची शहानिशा करायलाही कोणी धजावले नाही. त्यातल्या एकाला ताप आला आणि सातआठ दिवसांत तो उलटला!

कफनचोर । ९