पान:लाट.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्गारला, “तिची अवस्था फार वाईट आहे."
 “असू दे! मी आता काही करू शकत नाही."
 "तू येऊ नकोस. निदान काही पैसे तरी!"
 "नो! मी काहीच करणार नाही. काही करू इच्छीत नाही. मला पुन्हा काही विचारू नकोस! याकरिता भेटू नकोस."
 तो गप्प राहिला. एक आवंढा गिळून हताशपणे माझ्याकडे पाहू लागला.
 "हे बघ! काळीशी असलेल्या माझ्या संबंधाची मला शरम वाटते. माझ्या आयुष्यातली ती एक किळसवाणी बाब आहे असे वाटते. माझ्या चारित्र्यावरचा एक कलंक वाटतो. आणि तो धुऊन टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते सारे पूर्वीचे विसरून जातो आहे. स्वत:ची त्या किळसवाण्या प्रकारातून मला सुटका करून घ्यायची आहे. तू कशाला मला त्यात पुन्हा अडकवतो आहेस?"
 माझ्या या बोलण्याचा त्याच्या मनाला बसलेला धक्का त्याच्या चेहऱ्यावर उमटला. त्याच्या मनाला खूप झालेल्या वेदना त्याच्या डोळ्यांत प्रकट झाल्या. काही क्षण दगडासारखा निश्चल असा तो माझ्यापुढे उभा राहिला. “तुला सारे किळसवाणे वाटते?' तो पुटपुटला.
 "होय."
 "तुझी खात्री आहे?"
 "होय होय होय."
 "ठीक आहे. यापुढे तुला मी काळीच्या वतीने काही सांगायला येणार नाही."
 'थँक्स-मेनी मेनी थँक्स!' मी म्हणालो. परंतु माझे थँक्स घ्यायलाही तो तिथे थांबला नाही. माझ्याकडे त्याने पाठ वळवली आणि सावकाश चालत तो रस्त्यावरल्या गर्दीत मिसळला; दिसेनासा झाला.
 "त्या काळेच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.” मी बायकोचे विलक्षण शिगेला पोहोचलेले कुतूहल शमविले. “लेकाचा सारखा पैशांची याचना करतो आहे. याच्या बापाचा मी काय देणेकरी लागतो आहे?"
 त्यानंतर मात्र शिवाने पुन्हा माझ्यापाशी काळीचा विषय कधी काढला नाही. पुन्हा येऊन मला कधी सतावले नाही. तिच्याकडे चलायचा आग्रह केला नाही आणि तिच्या वतीने पैशाची मागणी केली नाही. कधी रस्त्यात दिसताच दुरूनच नाहीसा होऊ लागला. आणि एखादेवेळी अचानक समोरासमोर गाठ पडलीच तर मामुली चार शब्द बोलून तो पुढे सटकू लागला आणि दुरान्वयाने का होईना, काळीशी येणारा माझा संबंध असा कायमचाच तुटला.

 त्यानंतर मात्र तो कायमचाच भेटेनासा झाला. अनेक महिने दृष्टीस पडला नाही. कुणीतरी एक दिवस सहजपणे सांगितले की, तो कम्युनिस्ट पक्षात सामील झाला आहे. परंतु मी तिकडे विशेष लक्ष दिले नाही. मग एकदा तो मला भेटला आणि त्याने सांगितल्यावरून कळले की, काळी आता त्याच्या खोलीवरच राह्यला गेली आहे आणि तिच्याशी लग्न करायचा त्याचा बेत आहे!

आम्हां चौघांची बाई । १०९