पान:लाट.pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागल्या. आपल्या आयुष्यातला तो एक अत्यंत गलिच्छ भाग असल्यासारखे मला वाटू लागले. तो मूळातच विसरून जाण्याची मी पराकाष्ठा करू लागलो.
 परंतु एक दिवस बायकोबरोबर सहज रस्त्याने फिरत असताना लांब मला शिवा दिसला आणि नकोशा वाटणाऱ्या आठवणी एकदम मनात दाटल्या. विसरलेले चारित्र्य एकाएकी नजरेसमोर उभे राहिले. मला स्वत:ची लाज वाटू लागली आणि शिवाचा तिरस्कार मनात दाटला. त्याला टाळायचा मी प्रयत्न करू लागलो. सरळ दुसरा रस्ता पकडला. परंतु त्याने मला नेमके हेरले आणि माझ्यासमोर येऊन तो उभा राहिला. अनिच्छेनेच मी त्याची बायकोशी ओळख करून दिली.
 "आहेस कुठे?" त्याने विचारले.
 "इथेच!"
 "बायको सोडीत नाही?"
 त्याचे हे बोलणे माझ्या बायकोला आवडले नाही. ती मला तिथून निघायला खुणा करू लागली.
 "तुझ्यापाशी माझे काम होते." तो पुढे म्हणाला.
 "काय आहे? बोल ना!"
 परंतु तो काही क्षण गप्प राहिला. माझ्या बायकोकडे त्याने एकदा पाहिले. त्याला तिची अडचण होत असल्याचे माझ्या लक्षात आले.
 "काळेने तुला बोलावले आहे-" तो अखेर म्हणाला.
 "काळे?"
 "काळे-मि. काळे." त्याने पुन्हा म्हटले आणि उगाच डोळे मिचकावले आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
 "त्याला सांग, सध्या मला भेटता येणार नाही."
 "पण-पण नुसते भेटायला."
 "नो नो! सध्या शक्यच नाही!" असे म्हणून मी त्याला वाटेला लावले. बायकोच्या हजेरीत त्याने आपल्याशी काळीचा सरळ उल्लेख केला नाही हे मला बरे वाटले. त्यानंतर तो दोनतीनदा असाच भेटला तेव्हा बायकोचा मला असाच ढालीसारखा उपयोग झाला. तिच्या अस्तित्वाचे संरक्षण लाभू लागले. कारण तो तिच्यासमोर काळे या नावानेच काळीला संबोधू लागला. 'काळेला फार वाईट दिवस आलेत!', 'एकदा तरी काळेला भेटून ये!' इतपत तो तिच्याविषयी माझ्यापाशी बोलू लागला.
 परंतु माझ्या बायकोला मात्र या काळेचे विलक्षण कुतूहल वाटू लागले. मी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि एक दिवस शिवा असाच भेटल्यानंतर तिच्याविषयी बोलू लागला, तेव्हा त्याला दंडाला धरून मी एका बाजूला नेऊन सांगितले, “कृपा करून हा प्रकार थांबव!"

 त्याने मला एकदा आपादमस्तक पाहिले. मग आवाजात भावनाविवशता आणून तो

१०८ । लाट