पान:लाट.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुमित्रा गोखले!...फासाला लटकलेल्या त्या प्रेताऐवजी, सुमित्रा गोखलेचा लटकणारा, हेलकावणारा देह मला दिसू लागला. आणि मी शहारून गेलो! तिचा तो निर्जीव, भेसूरपणे हलणारा देह पाहून दु:खावेगानं माझं मन फाटून गेलं. पश्चात्तापानं पोळलेल्या अंत:करणानं सुमित्रा गोखलेच्या नावानं मी मनातल्या मनात टाहो फोडू लागलो...


 त्या रात्री स्वत:ला आवरणं मला अशक्य झालं. मी टेबलापाशी बसलो आणि समोरचे कागद पुढं ओढले. आणि मग मनातल्या भावनांच्या समुद्रातून भाषेचा ओघच्या ओघ कागदावर वाहू लागला. शब्दांचा सैरावैरा लोंढाच्या लोंढा आला आणि त्यातून सुमित्रा गोखले आकार घेऊ लागली. तिचं भोळंभाबडं व्यक्तिमत्त्व त्यातून साकार होऊ लागलं. त्या मुलीच्या आत्महत्येपासून अंधुकपणे मनात वावरत असलेली ती कथा एखाद्या चित्रासारखी कागदावर उतरू लागली. आणि किरकोळ, सर्वसामान्य माणसांप्रमाणं दुबळं प्रेम करणाऱ्या सुमित्रा गोखलेच्या व्यक्तिमत्त्वाला, प्रेमासाठी आत्महत्या करणाऱ्या धीरोदात्त नायिकेच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मुलामा चढू लागला...देहभान विसरून रात्रभर मी लिहीत होतो. पहाटे थकून मी टेबलावर डोकं टेकलं....
 सुमित्रा गोखले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आली. तेव्हा थकल्यासारखा मी लोळत पडलो होतो. येताच टेबलावर लिहून ठेवलेले कागद तिने पाहिले. माझ्याशी एक शब्दही न बोलता कुतूहलानं ती ते वाचू लागली. ती वाचत असताना मी तिच्याकडे पाहत राहिलो. वाचता वाचता तिचा चेहरा किंचित फुलला. वाचून होताच हातातले कागद तिनं पुन्हा होते तसेच टेबलावर ठेवले आणि संथपणे तिथंच खुर्चीवर बसत तिनं विचारलं, “हे सगळं तुम्ही काय लिहिलं आहे?"
 "तुला कळलं नाही काय?"
 "कळलं थोडंसं. त्यातला माझ्याविषयीचा भाग तेवढा कळला. माझ्या जीवनात लिहिण्यासारखं असं काय आहे?"
 "काहीच नाही?" मी आश्चर्यानं विचारलं.
 "ठीक आहे. कथा कधी पुरी होईल?"
 मी खिन्नपणं उत्तरलो, "कुणास ठाऊक? खरं सांगू का? रात्री देहभान विसरून मी हे लिहिलं. परंतु त्या कथेला हवा तो आकार आलेला नाही. त्या शोकांतिकेत आवश्यक तो आवेग येत नाही. पश्चात्तापानं पोळलेल्या नायकाच्या अंत:करणाचं दु:ख त्यात प्रकर्षानं प्रकट होत नाही. माझ्या मनातला हवा तो आशय कागदावर उतरलेला नाही. असं का व्हावं? मी तुझ्या भावनाशी पुरता समरस झालो नाही की काय? की तुझं दु:खच पुरतेपणी मला कळलं नाही? की माझं शब्दसामर्थ्यच लंगडं पडलं? माझी प्रतिभाच पंगू आहे का? सुमित्रा गोखलेचं दु:ख, तिच्या वेदना साकार करण्याइतकंही सामर्थ्य तिच्यामध्ये नाही?"

 बोलता बोलता धडपडत मी उठून उभा राहिलो आणि असहायतेनं तिच्याकडे पाहू लागलो. माझ्या प्रतिभेच्या कक्षेत ती मावत नसल्याची जाणीव मला असह्य झाली. माझ्या

लाट । ९७