पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं.
 आज गहू मिळायला हवा होता, पण दुकान बंद. दुकानदार अचानक बालाजीच्या यात्रेला गेला होता व आठ दिवस येणार नव्हता, तेव्हा तो गावात सरपंच - पोलीस पाटलाच्या उंब-याशी गेला व कुपन दाखवून त्यानं थोडे जोंधळे व बाजरी उसनी मागिताली. सरपंच उर्मट होता. त्यानं भिकाच्याप्रमाणे राघूला हाकलून लावलं. पाटलाचा बाप माळकरी होता. त्याने दोन पसे बाजरी दिली. तेवढाच पोटाला दोन दिवस आधार झाला.
 अशातच वणवणता राघूला विसपुते भेटले. त्यानं संकोचानं रामराम घातला, तसे खूश होऊन त्यांनी राघूची अघळपघळ चौकशी केली आणि त्याचा प्रश्न जाणून घेतला. त्याच्याकडून निम्मी कुपनं घेऊन पन्नास रुपये दिले व एका फॉर्मवर अंगठा घेतला व आपल्या मोटारसायकलवर मागे बसवून त्याला तहसील कचेरीत नेलं. तिथे त्याच्यासमक्ष तो अर्ज रावसाहेब शिंद्यांना दिला. त्यांनी लगोलग त्याला रांजणीच्या बंडिंगच्या कामावर जाण्याचा हुकूम दिला.
 विसपुते तालुक्यालाच राहात असल्यामुळे त्याला एस. टी. चे पाच रुपये खर्चुन परत यावं लागलं. पण त्यांनी दिलेल्या पैशातून राघूनं दोन दिवस पोटापाण्याची सोय केली.

 मग रात्री त्यानं हा विषय मैना व ठकूबाईपुढे काढला, “कारभारणे, रांजणी चांगली चार - सा कोस हाय बंग जायला. पन तितं जायला पाहिजे, नाय तर जगणं कठीण हाय बघ."
 जाऊ की कारभारी - पण ननंदबायला यवढं चालणं झेपेल का? काल सांजेपास्नं त्याच आंग मोडून आलंया आन् गरमबी जालंय..."
 मैनानं विचारलं तसा काहीसो गहिवरून राघू म्हणाला,
 "व्हय म्या बघतो ना -ठकुबाय लई बीमार हाय, पन् म्या असा करंटा भाऊ - जो भणीचं दवादारू करू नाय शकत. आसं कर ठकुबाय, तू पोरास्नी घिऊन इथेच रहा - एक हप्त्यानंतर म्या तुला नेतो."
 “नाय दादा - म्या बरी हाय - म्या येते तुमासंगट - तेवढीच रोजी पद पडेल.... जायला जरा वेळ लागेल - पन म्याबी येते दादा --" ठकूबाई साचून म्हणाली.
 राघू व मैना दोघांनाही तिची प्रकृती माहीत होती, पण प्रश्न रोजीचा होता, जगण्याचा होता, त्यांनी तिथंच विषय संपवला.

 दुस-या दिवशी सकाळी भाकरतुकडा फडक्यात बांधून ते मुलासह निघाले, रांजणीला जाणारा रस्ता रेशन दुकानावरून जाणारा होता. त्यानं थोडं थांबून चौकशी

७६ । लक्षदीप