पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली, पण अजूनही बालाजीला गेलेले शर्मा दुकानदार परत आले नव्हते. त्यांच्या नातवाचं जावळ व बारसं तिथं होतं, अस घरातल्या मुनिमानं सांगितलं तेव्हा अजिजीनं त्यानं म्हणलं,
 “पन मुनीमजी, तुमी दुकान उघडा ना. मह्या जवळ लई कुपनं हायती गव्हाची - ती त्यवढी मोडून दिवा की - पोरंबाळं आन् भण भुकेली हायत हो..."
 “हे बघ राघू, - शेटजी दुकान बंद ठेवायला सांगून गेले आहेत, मला उघडता येणार नाही. पुन्हा तुझी कुपनं ही बोरसरची. त्या गावचा माल अजून आणला नाही. समजलंस? जा आता, माझा जीव खाऊ नको."
 “पन - शेटजी," न राहावून मैना मध्येच म्हणाली, “म्या म्हंते - आसं दुकान न सांगता सवरता बंद ठिवता येतं? जंतेचे हाल हो केवढे? आमचंच बघा ना - जवळ लई कुपनं हायती - पण ती काई पोटास्नी घालता येत नाहीत. कसे भरावं खळगं? लहानी पोरं हायती - बीमार ननंद हाय - पोटाला नगो...?"
 “ए भवाने, मला जाब विचारतेस?" संतापून आपल्या चिरक्या आवाजात मुनीमजी फणफणला, “राघू, तुझ्या बायकोला सांग - माझ्याशी नको बोलू म्हणून, मी बाईमाणसांशी नाही बोलत!"
 सोशिक राघू आपल्या कारभारणीवरच चिडला, “ए, गप बये, तुला काई समजता का? उगी आपली पिरपिर... गप्प... गप रहा बघू!" आणि लाचारीच्या स्वरात तो मुनीमजीकडे वळून म्हणाला.
 “गलती जाली मुनीमजी - कारभारनीला काई अक्कल नाय, माफी असू दे.... म्या नंतर येतो कुपन मोडायला...!"
 त्याला लाचारी पत्करून शांत राहणे भाग होते. कारण नेहमी रेशन दुकानात ज्वारी साखरेसाठी जावं लागत असे. त्यानं फटकन देणं बंद केलं तर? हा प्रश्न होता. अाज नाहा, चार आठ दिवसांनी का होईना परत त्याच्या दारी जाणं भाग होतं कुपनावरचे गहू घेण्यासाठी, अनेकदा तर शर्माच ते गहू विकत घेत असे. अर्थातच पडत्या भावान. राघूची वा इतर गावक-यांची त्याबद्दल काही तक्रार नसे.
  दम खात, अडखळत आपली शक्तिविहीन कुडी खेचत ठकुबाई आपल्या "" फराविशी रांजणीला पोचली. तेव्हा ऊन उतरणीला लागलं होतं. आणि " नालाबोडचं काम संपायला आलं होतं. ठकबाईनं मैनाच्या आधारानं तिथल्या एका झाडाखाली गलितगात्र होऊन बसकण मारली.

 राघू तिथल्या मुकादमाकडे गेला. कामावरचा, कृषी सहायक केव्हाच तालुक्याला निघून गेला होता. राघूनं तहसीलदाराचं पत्र मुकादमाला दिलं. ते वाचून तो म्हणाला, "पण मंगळवारीच हप्ता सरू झाला. हजेरीपटावर त्याच दिवशी नावं लिहिली जातात. आता पुढच्या मंगळवारी ये....!"

लक्षदीप । ७७