पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्य नाही..."
 मी नाही जात?" गजरा शांतपणे म्हणाली, "वेळवखत आला की मानपान बाजूस सारावा लागतो आणि कर्ज करण्यापेक्षा, उसनंपासनं घेण्यापेक्षा कष्ट करून रोजीनं दहा बारा रुपयेच का होईना कमावणं चांगलं नाही का?"
 "गजरे, एक दिवस कामावर गेलीस अन् चुरुचुरु बोलायला लागलीस? हे तुझे भिक्कारडे विचार तुझ्याजवळच ठेव. मला ते पटायचे नाहीत. मी तुला कामावर जाऊ देतोय ते मोप हाय..."
 आणि त्यानं हा विषय तिथंच संपवून टाकला होता.
 हताश होऊन गजरा आपल्या नव-याकडे पाहात राहिली. हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा तिला आपल्या नव-याची मनस्वी चीड आली होती. 'असला कसला हा अट्टाहास?... वेळवखत जाणता येत नाही.... घरी पोटचा पोर उपासमारीनं सुकलाय.... त्याच्या दुधाची परवड चाललीय... काही म्हणून काम करायला नको.... अशा वेळी पण... मग याला पुरुष कशाला म्हणायचं? आपल्या शरीरावर हक्क गाजवतो म्हणून?'
 तिला वाटलं हेतं.. हणमंता आपलं ऐकेल. आपण जोडीनं कामावर जाऊ. म्हणजे मुकादमाची लुब्री नजर शांत हेईल... बिनधोकपणे काम करता येईल. पण छ.... आपल्याकडे का पुरुष घरच्या बायकांचे ऐकतात? हा आपला नवरा तर शहाण्णव कुळीचा... तो कसा ऐकेल?
 आपल्या मनातले बंडखोर विचार तिला पेलवेनात. तेव्हा प्रयत्नपूर्वक ते तिला मनाआड करावे लागले होते.
 पण आज तीन महिन्यानंतर पुन्हा तसेच विचार मनात येत होते आणि पुन्हा एकदा मन शिणत होते!
 कामाची तपासणी करून इंजिनिअर साहेब गेले आणि कामाला सुरुवात झाली. गजराही आपल्या बॅगमध्ये काम करू लागली. परुष गडीमाणसं माती खोदीत होती व टोपल्यातून ती माती भरावावर स्त्री मजुरांमार्फत टाकली जात होती.
 आता कामाला गती आली होती. उन्हं वाढत होती, त्याचे चटके बसत होते. अग घामेजली होती, पण पदरानं घाम पुशीत काम अव्याहत चाललं होतं...
 दुपारी जेवायची सुट्टी झाली, तेव्हा झाडाखाली आपल्या मैत्रिणीसोबत गजरानंही गराचा पुरचुडी सोडत जेवायला सुरुवात केली. भरपर घाम गाळल्यानंतर हायब्रीडची भाकरीही आताशी गोड वाटत होती.... ती खुदकन हसली...आपण बदलत आहोत.शरीरानं आणि मनानंही. शरीरानं जास्त चिवट, अधिक कणखर. मनानं बंडखोर व विचारी.

 पुन्हा एकदा ती सल ठसठसू लागली...

लक्षदीप । ६३