पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कदाचित परत भारतात येणार नाही, पण हेही तितकंच खरं, की भारतातला आजचा जम्मू काश्मीर हा भाग पाकिस्तानला कदापिही दिला जाणार नाही. त्याबाबत भारतात शंभर टक्के एकमत आहे. सवाल एवढाच आहे, की काश्मीरचे भारताशी मनोमीलन केव्हा व कसे होणार? त्यासाठी कश्मीरियत आणि हिंदुस्थानियत एकरूप करावी लागेल; तीही कला - संस्कृती व धर्मसहिष्णुतेच्या आधारे. ते एक दिवस जरूर होणार आहे, एवढा दिलासा मला निश्चितपणे माझ्या काश्मीर सफरीत मिळाला.
 हजरतबल हा आमच्या काश्मीर सफरीचा शेवटचा टप्पा होता. तिथून आम्ही सरळ श्रीनगर विमानतळावर जाणार होतो. ही मशीद पाहून बाहेर आलो व बगीच्यातून फेरफटका करताना समोर दिसणारं दाल लेक व त्या मागच्या निळसर हिमराशी अंगाखांद्यावर बाळगत दिमाखाने उभ्या असलेल्या गगनचुंबी हिमालय रांगा पाहताना काश्मीरबाबतची प्रसिद्ध काव्यपंक्ती आठवली. ती मी गुणगुणू लागलो -

‘अगर फिरदौस बर रुई जमिन अस्त
हमी अस्त ओ हमी अस्त!'

 आणि जाणवलं की माझ्यासोबत गेले तीन दिवस साथ देणारा आमचा हुरियतशी सख्यत्व बाळगणारी काश्मिरी ड्रायव्हरही त्याच फिरदोसच्या ओळी माझ्या सुरात सूर मिळवून म्हणत होता -
 'जगात जर कुठे स्वर्ग आहे, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे.'
 त्याक्षणी त्याची काश्मिरियत व माझी हिंदुस्थानियत जणू एकरूप झाली होती. आम्ही एकरूप झालो होतो. काश्मीर वे भारत एक झाला होता!
 तथास्तु! आमेन!


०-०-०

लक्षदीप । ४१७